स्मिथवरील बंदी कमी करण्याची मागणी

चेंडू फेरफारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने पाणावलेल्या डोळ्यांनी सर्वाची माफी मागितली. या त्याच्या हृदयद्रावक माफीनाम्यानंतर देशभरात त्याच्याबाबत सहानुभूतीची लाट उसळली आहे. याचप्रमाणे त्याच्यावर घालण्यात आलेली बंदीची शिक्षा कमी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

केपटाऊनच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडू फेरफार केल्याप्रकरणी स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याचप्रमाणे कॅमेरून बँक्रॉफ्टला नऊ महिने बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर मायदेशी परतलेल्या खचलेल्या स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर दिलगिरी प्रकट केली. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनीसुद्धा चालू कसोटी सामन्यानंतर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

खेळाडूंच्या मानसिक स्थितीचा वेध घेणारी प्रतिक्रिया लेहमन यांनी दिली होती. स्मिथ आणि बँक्रॉफ्ट यांच्या भावनिक कबुलीनंतर मी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय पक्का केला, असे लेहमन यांनी सांगितले.

‘‘प्रिय ऑस्ट्रेलिया, आता पुरे झाले. हा चेंडूचा फेरफार होता, हत्या नव्हे!’’ अशा शब्दांत लेहमन यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ‘दी टाइम्स’ या ब्रिटनच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरील मुख्य बातमी ठरली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाची गर्विष्ठ संघ म्हणून ओळख होती. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर यांच्याबाबत क्रिकेटजगतात मोठा जनक्षोभ निर्माण झाला. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने सिडनी येथील ‘डेली टेलीग्राफ’ वृत्तपत्रात लिहिले की, ‘‘आम्ही सर्वच जण दुखावलो असल्याने संतापलो आहोत. यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करावी, हेच सुचत नाही. कारण अशा प्रकारच्या घटनेला कधीच सामोरा गेलो नव्हतो.’’

‘‘स्मिथ आणि बँक्रॉफ्ट हे दोघेही चांगले व्यक्ती आहेत. मात्र त्या क्षणी त्यांनी मूर्खपणा केला. त्यांना दुसरी संधी मिळायलाच हवी. त्यामुळेच त्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेला सामोरे जाताना या दोघांनी फार मोठे धर्य दाखवले, असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने म्हटले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियावर  दडपण वाढले

चेंडू फेरफार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’वरील दडपण आता कमालीचे वाढले आहे. आता प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीच्या कराराबाबतही अनिश्चितता पसरली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे महत्त्वाचे पुरस्कर्ते ‘मॅगेलान’ यांनी आपला करार संपुष्टात आणला आहे. ऑगस्ट २०१७मध्ये ‘मॅगेलान’ने क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी तीन वर्षांसाठी दोन कोटी डॉलर रकमेचा करार केला होता. याचप्रमाणे एएसआयसीएस या क्रीडासाहित्य निर्मिती कंपनीनेही डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्याशी करार मोडीत काढला आहे.

लँगर संभाव्य प्रशिक्षक

डॅरेन लेहमन यांच्यानंतर प्रशिक्षकपदावर माजी कसोटी सलामीवीर जस्टीन लँगर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.