सध्या फक्त खुल्या मैदानात व्यायाम करायला परवानगी देण्यात आली असून, गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायामशाळा, तंदुरुस्ती केंद्रे पुन्हा सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यासाठी महाराष्ट्र तसेच मुंबई उपनगर आणि मुंबई शहर शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी संसदीय कामकाज आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील पत्र देण्यात आले.

केंद्र सरकारने व्यायामशाळा सुरू करण्याबाबत प्रमाणित कार्यप्रणाली तयार केली आहे. त्याच धर्तीवर कार्यप्रणाली तयार करून व्यायामशाळांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच तंदुरुस्ती के ंद्रांना आकारण्यात येणारा १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी करण्याची मागणीही या वेळी केली. राज्य सरकारच्या वतीने या मागण्यांचा विचार करण्यात येईल तसेच जीएसटीसंदर्भातील निवेदन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल, असे आश्वासन अनिल परब यांनी दिले.

क्रिकेट सुरू करण्यासाठी ‘एमसीए’ची १४ ऑगस्टला बैठक

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी समितीची बैठक १४ ऑगस्टला होत असून, शहरातील क्रिकेट पुन्हा सुरू करणे, हाच विषयपत्रिकेवरील मुख्य मुद्दा आहे. करोनाची साथ पसरल्यामुळे मुंबईतील क्रिकेट मार्चच्या मध्यापासून स्थगित झालेले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्व राज्य संघटनांना आखून दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार क्रिकेट पुन्हा सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे एका कार्यकारिणी सदस्याने सांगितले. क्रिकेट सुधारणा समितीची नेमणूकसुद्धा या बठकीत होऊ शकेल. गुणलेखक दीपक जोशी यांनी ‘बीसीसीआय’च्या निवृत्त गुणलेखकांचा प्रश्न ‘एमसीए’ला पत्र लिहून मांडला आहे. या विषयावरही बैठकीत चर्चा होऊ शकते.