देशभरात सध्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले असतानाच रणजी स्पर्धेत खेळणा-या क्रिकेटपटूंनाही याचा फटका बसू लागला आहे. मुंबईत आलेल्या गोव्याचा संघ आणि कोलकात्यात खेळणा-या विदर्भाच्या संघातील खेळाडूंची या नोटबंदीने अक्षरशः विकेटच घेतली असून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्याने या खेळाडूंना जेवण मिळणेही कठीण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला होता. यानंतर देशभरातील बँकांसमोर नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. या निर्णयाचा फटका आता क्रिकेटपटूंना बसला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेसोबतच देशभरात सध्या रणजीचा मौसम सुरु आहे. गोवा, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, तामिळनाडू, उत्तरप्रदेश असे विविध संघ देशाच्या कानाकोप-यात क्रिकेट खेळत आहेत. या संघातील क्रिकेटपटूंची या नोटबंदीने कोंडी केली आहे. क्रिकेटपटूंना त्यांच्या जेवणाचे पैसे (जेवण भत्ता) दिले जातात. पण केंद्र सरकारने अचानक नोटा रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने क्रिकेटपटूही हवालदील झालेत. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर केरळ विरुद्ध गोवा या संघाचा सामना सुरु आहे. क्रिकेटपटूंच्या अडचणीविषयी माहिती देताना गोव्याचे प्रशिक्षक प्रकाश मयेकर म्हणाले, आम्ही जेवणाची ऑर्डर दिली तरी आम्हाला पाचशे किंवा हजारच्या नोटा देता येत नाही. काही खेळाडूंनी बाहेर जाऊन कार्डद्वारे पैसे भरुन जेवण मागवले. पण दररोज असे बाहेर जाऊन जेवण आणणे कठीण आहे असे त्यांनी नमूद केले. आम्हाला दररोज हजार रुपये मिळतात. आता या नोटा बदलून आणणे आमच्यासाठी कठीण आहे असे त्यांनी सांगितले.

विदर्भच्या संघाचीही अशीच काहीशी अवस्था झाली आहे. विदर्भचा संघ सध्या कोलकात्यामध्ये महाराष्ट्रविरुद्ध खेळत आहे. संघाचे व्यवस्थापक किशोर वाकोडे म्हणाले, आमच्या खेळाडूंकडे आता पैशेच नाही. आम्ही शेवटी बंगाल क्रिकेट असोसिएशनकडे मदत मागितली. पण त्यांच्याकडेही नव्या नोटा नसल्याने तेदेखील मदत करु शकत नाही. आता आम्हालाच पैसे मिळवण्यासाठी काही तरी करावे लागेल असे त्यांनी सांगितले.

क्रिकेटपटू रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलच्या बाहेर जातात. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या क्रिकेटपटूंना हॉटेलमध्ये जेवण मागवण्याची सुचना केली आहे. मुंबईतील काही क्रिकेटपटू प्रसिद्ध आहेत. ते नोट बदलण्यासाठी रांगेत जाऊन उभे राहिल्यास सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो अशी शक्यता एमसीएचे सहसचिव उन्मेष खानविलकर यांनी वर्तवली आहे. एमसीएने क्रिकेटपटूंना जेवण भत्त्यासाठी रोख रक्कम देणे टाळले आहे असे त्यांनी सांगितले. तर तामिळनाडू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने जेवण भत्त्याचे पैसे थेट क्रिकेटपटूंच्या बँक खात्यात जमा केले असून त्यांना दररोज जेवण हॉटेलमध्येच मिळेल याचीची खातरजमा केली आहे.