डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : रामकुमारचा विजय; युकी पराभूत

रामकुमार रामनाथनच्या झंझावाती खेळाने भारतीय संघाच्या पल्लवित केलेल्या आशेवर सहकारी युकी भांब्रीच्या पराभवाने पाणी फेरले. त्यामुळे भारतीय संघाला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटासाठीच्या बाद फेरीतील लढतीत कॅनडाविरुद्ध शनिवारी १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत युकीने ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारून २-२ अशी बरोबरी मिळवली, परंतु जागतिक क्रमवारीत ५१ व्या स्थानावरील डेनिस शापोव्हालोव्हकडून त्याला पराभव पत्करावा लागला. शापोव्हालोव्हने युकीचा कडवा संघर्ष ७-६(२), ६-४, ६-७(६), ४-६, ६-१ असा मोडून काढला. तीन तास आणि ५२ मिनिटे चाललेल्या या लढतीने प्रेक्षकांची मने मात्र जिंकली. तत्पूर्वी, २२वर्षीय रामकुमारने पदार्पणवीर ब्रॅयडेन श्चुनूरवर ५-७, ७-६(४), ७-५, ७-५ असा तीन तास आणि १६ मिनिटांच्या लढतीत विजय मिळवला.

‘‘खेळाडूंनी मनापासून खेळ केला. प्रत्येक गुणासाठी संघर्ष करण्याची आमची रणनीती होती आणि रामने पिछाडीवरून यशस्वी मुसंडी मारली. युकीही विजयाच्या जवळ आला होता. आजच्या निकालानंतर त्यांच्यावरील दडपण अधिक वाढले आहे. अशाच प्रकारे आम्ही खेळलो तर काहीही अशक्य नाही,’’ असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेश भूपती याने व्यक्त केले.