नाशिक जिल्ह्य़ातील मूळचा मनमाडचा परंतु सध्या डेन्मार्कमध्ये स्थायिक इंग्रजीचा प्राध्यापक राहुल एळिंजे यांच्या प्रेमात पडलेली डेन्मार्कची आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सिसिलिया पीटरसन रविवारी येथील पल्लवी मंगल कार्यालयात बौद्ध पद्धतीने विवाहबद्ध झाली.

थायलंडचे भन्ते धर्मगुरू यांच्या उपस्थितीत वर-वधुंनी परस्परांना पुष्पमाला घातली.

या विवाहासाठी थेट डेन्मार्कहून वधूचे आई-वडील भाऊ व मैत्रीण असे वऱ्हाड येथे आले. राहुलची मराठमोठय़ा पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला साक्षी ठेवत भन्ते यांच्या उपस्थितीत दोघे जण विवाहबद्ध होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उभयतांना शुभेच्छा दिल्या.

राहुल हा मनमाडच्या गायकवाड चौकात राहणाऱ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक. मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयात प्रतिकूल परिस्थितीत राहुलने शिक्षण घेतले. आई वखारीत मजुरी करत असल्याने परिस्थिती बदलण्यासाठी जिद्दीने शिक्षण घेतले. पुढे डेन्मार्कच्या आरूस विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. तेथेच सिसिलिया या फुटबॉलपटूशी त्यांची ओळख झाली.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि प्रेमाचे रूपांतर विवाहात झाले. सिसिलिया हिला असलेल्या योग, विपश्यनाच्या आवडीने दोघांना एकत्र आणले.