भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने आपला विजयी फॉर्म कायम राखत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात कोरियाच्या ली ह्यूनवर २१-१०, २१-०५ अशी एकतर्फी मात करत श्रीकांतने डेन्मार्क ओपन स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावे केलं. डेन्मार्क ओपन स्पर्धा जिंकणारा श्रीकांत हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी प्रकाश पडुकोण आणि सायना नेहवाल या खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आहे. याचसोबत श्रीकांतने २०१७ वर्षातलं तिसरं सुपरसिरीज विजेतेपद आपल्या नावे केलं. याआधी श्रीकांतने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या सुपरसिरीज स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. आज डेन्मार्क ओपन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत श्रीकांतने सायना नेहवालच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

या स्पर्धेचा अंतिम सामना अटीतटीचा होईल अशी सर्वांनी अपेक्षा केली होती. मात्र प्रत्यक्षात हा सामना एकतर्फी झाला. ली ह्यूनने पहिल्या सेटमध्ये झटपट २ पॉईंट मिळवत सेटमध्ये आघाडी घेतली. मात्र श्रीकांतने तात्काळ सामन्यात पुनरागमन करत सेटमध्ये बरोबरी साधली. यानंतर हातात आलेली आघाडी श्रीकांतने पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सोडली नाही. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत श्रीकांतकडे ११-६ अशी भक्कम आघाडी होती. मध्यांतरानंतरही श्रीकांतने ली ह्यूनला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही. एकामागोमाग एक पॉईंट मिळवण्याचा सपाटा सुरु ठेवत श्रीकांतने पहिला सेट २१-१० अशा फरकाने आपल्या खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये ली ह्यून श्रीकांतला टक्कर देईल अशी सर्वांनी अपेक्षा वर्तवली होती. मात्र पहिल्या सेटच्या तुलनेत हा सेट आणखीनच एकतर्फी झाला. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच श्रीकांतने सामन्यात आश्वासक आघाडी घेत ली ह्यूनला बॅकफूटवर ढकललं. दुसऱ्या सेटच्या मध्यांतराला श्रीकांतने ११-१ अशी भरभक्कम आघाडी घेत सामन्यातले आपले मनसुबे स्पष्ट केले. मध्यांतरानंतर ली ह्यूनने काही गुणांची कमाई करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र सामन्यावर पकड बसवलेल्या श्रीकांतने ली ह्यूनला ही संधीच दिली नाही. २१-०५ च्या फरकाने दुसरा सेट झटपट जिंकत श्रीकांतने अंतिम सामना जिंकला.