डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आश्वासक कामगिरी केली आहे. भारताची फुलराणी सायना नेहवालने रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरीनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला आहे. सायनाने मरीनवर सरळ दोन सेट्समध्ये २२-२०, २१-१८ अशी मात केली. याआधी ग्लास्गोत झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवालने कांस्यपदकाची कमाई केली होती. पुढच्या फेरीत सायना नेहवालचा सामना थायलंड किंवा रशियाच्या प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे.

इतर भारतीय खेळाडूंमध्ये किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनीही आपल्या पहिल्या फेरीची सुरुवात विजयाने केली आहे. मात्र साई प्रणीत आणि पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सिंधूला चायनाच्या चेन युफेईने २१-१७, २३-२१ असं हरवलं. याव्यतिरीक्त दुहेरी आणि मिश्र-दुहेरी सामन्यांमध्येही भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सत्वीकसाईराज रेड्डी आणि त्याची साथीदार आश्विनी पोनप्पा यांना पहिल्याच फेरीत डेन्मार्कच्या  स्थानिक निकोलस आणि सारा या जोडीने १९-२१, १७-२१ अशी मात दिली.  पुरुष दुहेरीत सात्विक आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीला अटीतटीच्या लढतीत कोरियन जोडीकडून पराभव स्विकारावा लागला.

पुरुष खेळाडूंमध्ये किदम्बी श्रीकांतने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर २१-१७, २१-१५ अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. मात्र साई प्रणीतला आपल्या पहिल्याच सामन्यात १०-२१, १५-२१ अशी एकतर्फी हार पत्करावी लागली. मात्र एच. एस. प्रणॉयने आपल्या डेन्मार्कच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पिछाडी भरुन काढत सामन्यात बाजी मारली. सामन्यात एका क्षणापर्यंत डेन्मार्कच्या एमिल होल्स्टकडे ६-११ अशी आघाडी होती. मात्र यानंतर प्रणॉयने आक्रमक खेळ करत सामन्यात पुनरागमन केलं आणि २१-१८, २१-१९ अशा फरकाने सामनाही आपल्या खिशात घातला.