डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. उपांत्य फेरीत जपानच्या केंटो मोमोटाने श्रीकांतचा 21-16, 21-12 असा सहज पराभव केला. 42 मिनीटं चाललेल्या सामन्यावर मोमोटोने बहुतांश वेळ आपलं वर्चस्व गाजवलं. याआधीच्या फेरीत लिन डॅन, समीर वर्मा यांचं आव्हान मोडून काढत उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या श्रीकांतकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात श्रीकांत मोमोटचं आव्हान पेलूच शकला नाही. दोन्ही सेटमध्ये मोमोटोने आक्रमक खेळ करत श्रीकांतला आघाडी घेण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे एकतर्फी झालेल्या सामन्यात अखेरच्या काही क्षणांमध्ये श्रीकांतनेही फारशी लढत न देता पराभव पत्करला.