देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा * भारत ‘अ’ संघावर ४३ धावांनी मात

नवी दिल्ली : डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम व लेगस्पिनर मयांक मरकडे यांनी केलेल्या अप्रतिम फिरकी गोलंदाजीच्या बळावर भारत ‘ब’ संघाने देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत ‘अ’ संघावर ४३ धावांनी मात केली.

भारत ‘अ’ संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक (९९) आणि रविचंद्रन अश्विन (५४) यांनी कडवी झुंज दिल्यानंतरही संघाला पराभव पत्करावा लागला. भारत ‘अ’ संघाचा संपूर्ण डाव ४६.४ षटकांत २१८ धावांवर संपुष्टात आला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारत ‘ब’ संघाने ऋतुराज गायकवाडला (२) लवकर गमावले, मात्र हनुमा विहारी व मनोज तिवारी यांनी संघाला सावरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. तिवारी ५२ धावांवर धावचीत झाला, तर विहारीने नऊ चौकारांच्या साहाय्याने अखेपर्यंत नाबाद राहत ८७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारत ‘ब’ संघाने निर्धारित ५० षटकांत आठ फलंदाजांच्या मोबदल्यात २६१ धावांपर्यंत मजल मारली. भारत ‘अ’साठी अश्विनने सर्वाधिक दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘ब’ : ५० षटकांत ८ बाद २६१ (हनुमा विहारी नाबाद ८७, मनोज तिवारी ५२; रविचंद्रन अश्विन २/३९) विजयी वि.

भारत ‘अ’ : ४६.४ षटकांत सर्वबाद २१८ (दिनेश कार्तिक ९९, रविचंद्रन अश्विन ५४; शाहबाज नदीम ३/३२, मयांक मरकडे ४/४८).

* आजचा सामना : भारत ‘ब’ वि. भारत ‘क’

* सामन्याची वेळ : सकाळी ९ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

सामनावीर : शाहबाज नदीम