अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारत क संघाने यंदाच्या देवधर चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत भारत क संघाने ब संघावर २९ धावांनी मात केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना अजिंक्य रहाणे आणि इशान किशन या सलामीवीरांनी शतकं झळकावली. अजिंक्यने नाबाद १४४ तर इशान किशनने ११४ धावा पटकावल्या. पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी झाल्यानंतर ही जोडी अखेर तुटली. यानंतर इतर फलंदाजांच्या साथीने अजिंक्यने भारत क संघाला ३५२ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

भारत ब संघाकडून जयदेव उनाडकटने ३ तर मयांक मार्कंडे आणि दीपक चहरने प्रत्येकी २-२ बळी घेतले. मात्र भारत ब संघाचा एकही गोलंदाज सलामीच्या जोडीवर नियंत्रण ठेऊ शकला नाही. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात हातभार लावला.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारत ब संघाची सुरुवात चांगली झाली नाही. फॉर्मात असलेला मयांक अग्रवाल अवघ्या १४ धावांवर गारद झाला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाडने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र गायकवाड माघारी परतल्यानंतर भारत ब संघाच्या मधल्या फळीने पुरती निराशा केली. दुसऱ्या बाजूने कर्णधार श्रेयस अय्यरने संघाची बाजू लावून धरत शतक झळकावलं. श्रेयसच्या खेळीमुळे भारत ब संघाने ३०० धावांचा टप्पाही ओलांडला, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. १४८ धावांवर श्रेयस अय्यरला दिपक चहरने माघारी धाडलं. यानंतर बाकीच्या फलंदाजांनी फारशी लढत न देता शरणागती पत्करली आणि भारत क संघाने २९ धावांनी सामन्यात विजय संपादन केला.