नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कनिष्ठ क्रिकेटपटूंना जनधन खात्यातील ठेव मर्यादेचा फटका बसला आहे. जनधन खात्यात ५० हजारांच्यावर रक्कम जमा करता येत नाही, याचे कारण हे खाते समाजातील दुर्बल घटकांसाठी आहे. ‘बीसीसीआय’चे सहा कनिष्ठ क्रिकेटपटूंचे जनधन खाते आहे. मात्र त्यामुळे ‘बीसीसीआय’कडून त्यांना मिळणारे दीड लाख रुपये त्यांच्या जनधन खात्यात वर्ग होत नाहीत. ‘बीसीसीआय’च्या ११ जानेवारीला झालेल्या वार्षिक सोहळ्यात काही निवडक कनिष्ठ क्रिकेटपटूंना दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल पाच वेळा त्यांचे पैसे ‘बीसीसीआय’ला ठेव मर्यादेमुळे वर्ग करता आले नाहीत. या कनिष्ठ क्रिकेटपटूंच्या खात्यात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्याने नियमाप्रमाणे ‘बीसीसीआय’ला हे बक्षीस रकमेचे दीड लाख रुपये वर्ग करता येत नाहीत.