राष्ट्रीय फुटबॉल शिबिरात अनुपस्थित राहिल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने रोमिओ फर्नाडिझ व मंदार राव देसाई यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविण्यात आली आहे. महासंघाने या दोन्ही खेळाडूंना नोटिसीला उत्तर देण्यासाठी एक आठवडय़ाची मुदत दिली आहे. महासंघाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अनुपस्थितीबद्दल खेळाडूंवर दंडात्मक व अन्य कारवाई करण्यापूर्वी या खेळाडूंना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. हे दोन्ही खेळाडू इंडियन सुपरलीग स्पर्धेत गोव्याच्या डेम्पो क्लबकडून सहभागी झाले होते. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच त्यांना केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांनी शिबिरात आपली उपस्थिती नोंदविलेली नाही. या खेळाडूंकडून समाधानकारक खुलासा आला नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.