करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढण्यासाठी सर्व स्तरातील लोकं पुढे येत आहेत. अनेक सामान्य नागरिकांनीही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला मदत केली आहे. आजी-माजी खेळाडू, व्यवसायिकही सध्याच्या काळात भरघोस मदत करत आहेत. टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान आणि युसूफ पठाण यांनी सध्याच्या खडतर काळात, आपलं सामाजिक भान राखतं गरजू व्यक्तींच्या अन्नधान्याची सोय केली आहे. १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे पठाण बंधूंनी दान केले आहेत. याआधीही इरफान पठाण आणि युसूफ पठाणे गरजू व्यक्तींना मोफत मास्कचं वाटप केलं होतं.

मात्र या सर्व मदतकार्यानंतरही इरफानला सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता सर्व देशवासियांना घरातले दिवे बंद करुन दिवा लावायला सांगितला होता. संपूर्ण देशभरात लोकांनी याला चांगला प्रतिसादही दिला. परंतु काही भागात लोकांनी नियमभंग करत रस्त्यावर येत फटाके फोडले. इरफानने याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केल्यानंतर, त्याला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला. इरफानने काही स्क्रिनशॉट आपल्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

इरफान आणि युसूफ हे भाऊ आपल्या वडिलांच्या नावाने सामाजिक संस्था चालवतात. दरम्यान देशभरात सर्व महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा यावर कधी नियंत्रण मिळवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पठाण बंधूंव्यतिरीक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉक्सर मेरी कोम, हिमा दास, बजरंग पुनिया यासारख्या खेळाडूंनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.