धावपटू ललिता बाबरला विश्वास

गेल्या दोन वर्षांपासून अजून घरी गेले नाही, खडतर मेहनत आणि जिद्दीमुळे मी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले. ध्येय उंच असेल तर आणि खेळाडूंनी जिद्द व चिकाटी ठेवल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते, असा विश्वास ललिता बाबर हिने चिंचवड येथे बोलताना व्यक्त केला.

मराठा सेवा संघ, माण फाऊंडेशनसह विविध संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ललिता बाबर तसेच दत्तू भोकनळ या खेळाडूंचा नागरी सत्कार केला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ती बोलत होती.

मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, राजेंद्र कुंजीर, प्रकाश जाधव, राजेंद्र राजापुरे, राजेंद्र शेळके, रमेश तावडे आदी उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या वतीने बाबर आणि भोकनळ यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली.

ललिता बाबर म्हणाली, दुष्काळी माण ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खडतर आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद होताच, मात्र पदक न मिळाल्याची खंतही मनात आहे. ही खंत २०२० मधील टोकियो स्पर्धेत नक्कीच भरून काढणार आहे. चार वर्षे सरावासाठी मिळणार आहेत. त्यामुळे पदक मिळण्यासाठी आतापासूनच मेहनत घेणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मदत केली आहे.

आगामी स्पर्धा डोळय़ांसमोर ठेवून केंद्र सरकारने एक समिती नेमली आहे, त्याचा फायदा खेळाडूंना नक्कीच होईल. दत्तू भोकनळ म्हणाला, परदेशातील खेळाडू चार-चार वर्षे सराव करतात. मला अवघे सात ते आठ महिने मिळाले.

आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अडचणी आल्या. आता मात्र चार वर्षे मिळतील. नक्की पदक आणीन.