अंबाती रायुडु याने केलेल्या झंझावाती नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम लढतीत उत्तर विभागास पाच गडी व दहा चेंडू राखून पराभूत केले.
प्रथम फलंदाजी करताना उत्तर विभागाने ५० षटकांत ८ बाद २८९ अशी दमदार धावसंख्या उभारली.  त्याचे श्रेय उनमुक्त चंद व युवराजसिंग यांच्या अर्धशतकांना द्यावे लागेल. चंद याने सात चौकार व तीन षटकारांसह ८८ धावा केल्या. युवराजने ६७ धावा टोलविताना सात चौकार व तीन षटकार अशी आतषबाजी केली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर परवेझ रसूल (३२) व मनप्रित गोनी (नाबाद २५) यांनी दमदार खेळ करीत संघास पावणेतीनशे धावांपलीकडे नेले. पश्चिम विभागाकडून जयदेव उनाडकत याने ७३ धावांमध्ये दोन बळी घेतले.  
पश्चिम विभागाने सलामीवीर विजय झोल (१२) याची विकेट लवकर गमावली, मात्र त्यानंतर पार्थिव पटेल व मनप्रित जुनेजा यांनी ९७ धावांची भागीदारी केली. पार्थिव याने आठ चौकार व एका षटकारासह ५८ धावा केल्या. जुनेजा याने ५६ धावांमध्ये सात चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. ही जोडी फुटल्यानंतर रायुडु व केदार जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करीत संघाचा विजय दृष्टिपथात आणला. जाधव याने आठ चौकारांसह ५७ धावा केल्या. रायुडु याने नाबाद ७८ धावा करताना नऊ वेळा चेंडू सीमापार केला. त्याने अभिषेक नायर (नाबाद १९) याच्या साथीत ४९ व्या षटकात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उत्तर विभागाकडून अमित मिश्रा याने ६३ धावांमध्ये दोन बळी घेतले. रायुडु याला ‘सामनावीर’ पारितोषिक देण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
उत्तर विभाग-५० षटकांत ८ बाद २८९ (उनमुक्त चंद ८८, युवराजसिंग ६७, परवेझ रसूल ३२, मनप्रित गोनी नाबाद २५, जयदेव उनाडकत २/७३)
पश्चिम विभाग-४८.२ षटकांत ५ बाद २९३ (पार्थिव पटेल ५८, मनप्रित जुनेजा ५६, अंबाती रायुडु नाबाद ७८, केदार जाधव ५७, अमित मिश्रा २/६३)