लहान मुलांबरोबर खेळताना आपण त्यांच्याएवढे लहान होतो. त्यांचे आणि आपले विश्व वेगळे असले तरी त्यामध्ये त्यांना सामावून घेत त्यांच्या इच्छा, आकांक्षांना बळ देतो. एखादी चांगली गोष्ट केलीस, की मी तुला अमुक देईन, असे भावनिक करार तर नेहमीचेच. तसाच भावनिक करार त्या दोघांमधला. ती बालवाडीत, तर तो पॅरालिम्पिकमधला सुवर्णपदक विजेता दिव्यांग खेळाडू. ‘मी बालवाडीत पहिली आले तर तुम्हाला पुन्हा सुवर्णपदक पटकावून मला द्यावे लागेल,’ अशी बोबडय़ा स्वरात ती म्हणाली खरी, पण तिचे हेच बोल त्याच्या कानात कायम रुंजी घालत राहिले. स्पर्धेला पोहचल्यावरही त्याच्या कानात तिचे बोल घुमत होते. आणि पुन्हा एकदा विश्वविक्रम रचत, सुवर्णपदक पटकावत देवेंद्र झाझरियाने हा भावनिक करार पूर्ण केला. सुवर्णपदक पटकावण्यासाठी आपली लहानगी प्रेरणादायी ठरल्याचे देवेंद्र अभिमानाने सांगत आहे.

‘बालेवाडीत माझा पहिला नंबर आला आहे. आता तुम्हाला पण सुवर्णपदक मिळवावे लागेल,’असे म्हणत माझ्या सहा वर्षांच्या मुलीने मला त्या भावनिक कराराची आठवण करून दिली. स्टेडियममध्ये गेलो तेव्हा तिचे हे बोल कानात रुंजी घालत होते. त्यामुळे सुवर्णपदक पटकावण्याची ईर्षां पुन्हा एकदा माझ्या मनात निर्माण झाली आणि मी इतिहास रचू शकलो,’ असे देवेंद्र म्हणाला.

देवेंद्रने पहिल्या दोन संधींमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण तिसऱ्या संधीमध्ये त्याने स्वत:चाच विश्वविक्रम मोडीत काढत सुवर्णपदक मिळवले. पदक जिंकल्यावर देवेंद्रवर अभिनंदनाचा वर्षांव सुरू झाला. पहाटे पाच वाजेपर्यंत तो दूरध्वनीवरून अभिनंदनांचा स्वीकार करत होता. याबाबत देवेंद्र म्हणाला की, ‘ आता काय झापायचे. आता काही करायचे नाही. आता फक्त राष्ट्रध्वजाबरोबर आनंद साजरा करायचा.’

पॅरालिम्पकमध्ये आतापर्यंत मुरलीकांत पेटकरने सुवर्णपदक पटकावले होते. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रने सुवर्णपदक मिळवले होते. पण आतापर्यंत एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत भारताच्या कोणत्याही खेळाडूला दोन सुवर्णपदके पटकावता आलेली नव्हती. तो इतिहास देवेंद्रने रचला आहे.

पॅरालिम्पकसाठी देवेंद्र कसून सराव करत होता. त्यामुळे त्याला काही महिने घरीही जाता आले नाही. त्यामुळे त्याच्या दोन वर्षांच्या मुलाला आपले बाबा नेमके काय करतात, हे माहिती नाही. याबाबत देवेंद्र म्हणाला की, ‘ मी घरी फार कमी वेळासाठी असतो. त्यामुळे माझ्या लहान मुलाला मी काय करतो ते माहिती नाही. माझी बायको त्याला छायाचित्राच्या माध्यमातून मी काय करतो ते दाखवते. पण ते समजण्याचे त्याचे हे वय नक्कीच नाही. पण आता या स्पर्धेनंतर कुटुंबियांसमवेत काही काळ घालवायचा आहे.’

आईचा पाठिंबा

आईने नेहमीच मला पाठिंबा दिला. ती मला नेहमी सांगायची की, तू तुझ्या व्यंगावर लक्ष न देता खेळावर लक्ष केंद्रित कर. तिच्याकडूनच मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. लक्ष केंद्रित व्हावे यासाठी ती माझ्याशी दूरध्वनीवरूनही संपर्क साधत नाही.

पत्नीने कबड्डी सोडली

माझी पत्नी कबड्डी खेळायची. पण दोघेही खेळासाठी बाहेर असलो तर घरी कोण लक्ष देणार, हा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे घराकडे लक्ष देण्यासाठी आणि माझा खेळ कायम राहावा, यासाठी तिने कबड्डी सोडली.