श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी करणारे भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीमध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे. राहुलने अव्वल दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले असून तो नवव्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावलेला धवन २८व्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखले आहे.

पल्लीकेले येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धवनने ११९ धावांची खेळी साकारली होती. या खेळीमुळे धवनने १० स्थानांची झेप घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत धवनने दोन शतकांच्या मदतीने एकूण ३५८ धावा केल्या होत्या.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलने ८५ धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे राहुल क्रमवारीत दोन स्थानांनी पुढे सरकला असून तो कारकीर्दीतल सर्वोत्तम नवव्या स्थानावर पोहोचला आहे. या वर्षांतील जुलै महिन्यातही राहुल नवव्या स्थानावर पोहोचला होता, पण यावेळी त्याने ७६१ असे सर्वोच्च गुण पटकावले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने ९६ चेंडूंमध्ये १०८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. या खेळीच्या जोरावर पंडय़ाने फलंदाजांच्या क्रमवारीत ४५ स्थानांची झेप घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम असे ६८वे स्थान पटकावले आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी एका स्थानाची बढती मिळवत अनुक्रमे १९वे आणि २१वे स्थान पटकावले आहे. उमेश यादवचे हे कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाच्या जागी संघात आलेला फिरकीपटू कुलदीप यादवचीही क्रमवारीत सुधारणा झाली आहे. कुलदीपने २९ स्थानांची झेप घेत ५८वे स्थान पटकावले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळल्यामुळे जडेजाला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. बांगलादेशच्या शकिब अल हसनने अव्वल स्थान पुन्हा एकदा पटकावले असून जडेजा आणि शकिब यांच्यांमध्ये फक्त एका गुणाचाच फरक आहे.