आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर जोरदार धक्के बसत असतानाच  चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत विजयी सलामी देत भारतीय क्रिकेट संघाने देशवासियांना दिलासा दिला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या दणदणीत शतकी सलामीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर २६ धावांनी मात केली. शिखरचे दणकेबाज शतक, रोहित शर्माची धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने हाणामारी केल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना ३३१ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्याचा द. आफ्रिकेने प्रयत्न केला खरा, पण त्यांचा डाव ३०५ धावांवर आटोपल्याने हा प्रयत्न अयशस्वी ठरला. चॅम्पियन्स करंडकामध्ये तिसऱ्यांदा आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध अपयशी ठरला.
भारताच्या ३३२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची २ बाद ३१ अशी अवस्था होती. पण त्यानंतर कर्णधार ए बी डि’व्हिलियर्स (७०) आणि रॉबिन पीटरसन (६८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी रचत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण पीटरसन बाद झाल्यावर त्यांचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत गेले आणि त्यांच्यासमोर पराभव उभा ठाकला. रयान मॅकलारेनने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७१ धावांची खेळी साकारली खरी, पण तोपर्यंत सामना त्यांच्या हातून निसटला होता.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताच्या सलामीवीरांनी हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आखूड टप्प्याचे चेंडू टाकत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांनी अप्रतिम ‘हुक’ आणि ‘पुल’चे फटके मारत त्यांना चोख उत्तर दिले. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये जास्त धावा करण्याची चांगलीच चुरस रंगली आणि जलद धावा जमवण्यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केले. या दोघांनी १२७ धावांची सलामी देत संघाचा चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी अर्धशतक झळकवल्यावर ही जोडी आता मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने कूच करणार असे वाटत असतानाच मॅॅकलारेनला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला, त्याने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाला असला तरी धवनने गोलंदाजीचा समाचार घेणे सुरूच ठेवत एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ९४ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११४ धावांची खेळी साकारली. सलामीवीरांच्या मजबूत पायावर मधली फळी टोलेगंज धावांची इमारत बांधतील, असे वाटत होते. पण ठरावीक फरकाने भारताचे फलंदाज तंबूत परतत गेले आणि २ बाद २१० वरून ६ बाद २९१ असा त्यांचा धावांचा आलेख उतरंडीला आला होता. त्या वेळी भारतीय संघ सव्वातीनशे धावांचा पल्ला गाठेल की नाही याबाबत साशंकता होती. पण जडेजाने २९ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४७ धावांची खेळी साकारत संघाला ३३१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. पीटरसन गो. मॅकलारेन ६५, शिखर धवन झे. बदली खेळाडू (फँगिसो) गो. डय़ुमिनी ११४, विराट कोहली झे. अमला गो. त्सोत्सोबे ३१, दिनेश कार्तिक झे. डी’व्हिलियर्स गो. मॅॅकलारेन १४, महेंद्रसिंग धोनी झे. डय़ु प्लेसिस गो. त्सोत्सोबे २७, सुरेश रैना झे. डय़ुमिनी गो. मॅॅकलारेन ९, रवींद्र जडेजा नाबाद ४७, आर. अश्विन धावचीत (डय़ुमिनी) १०, भुवनेश्वर कुमार नाबाद ०, अवांतर १२ (लेग बाइज ४, वाइड ६, नो बॉल २), एकूण ५० षटकांत ७ बाद ३३१.
बाद क्रम : १-१२७, २-२१०, ३-२२७, ४-२४०, ५-२६०, ६-२९१, ७-३२३.
गोलंदाजी : मॉर्ने मॉर्केल ६.५-०-२७-०, लोनवाबो त्सोत्सोबे १०-०-८३-२, रॉरी क्लेइन्व्हेल्ड १०-०-८१-०, रायन मॅकलारेन १०-०-७०-३, रॉबिन पीटरसन ३.१-०-२४-०, जे.पी.डय़ुमिनी १०-०-४२-१.
दक्षिण आफ्रिका : हशिम अमला झे. धोनी गो. यादव २२, कॉलिन इनग्राम झे. रैना गो. कुमार ६, रॉबिन पीटरसन धावतीच ६८,  ए‘बी डि‘व्हिलियर्स झे. जडेजा गो. यादव ७०, जे.पी.डय़ुमिनी पायचीत गो. जडेजा १४, फॅफ डय़ू प्लेसिस झे. रैना गो. इशांत शर्मा ३०, डेव्हिड मिलर धावचीत ०, रायन मॅकलारेन नाबाद ७१, रॉरी क्लेइन्व्हेल्ड झे. धोनी. गो इशांत शर्मा ४, लोनवाबो त्सोत्सोबे त्रि.गो. जडेजा ३, मॉर्ने मॉर्केल त्रि.गो. कुमार ८, अवांतर ९ (लेग बाइज १, वाइड ७, नो बॉल १), एकूण ५० षटकांत सर्व बाद ३०५.
बाद क्रम : १-१३, २-३१, ३-१५५, ४-१८२, ५-१८४, ६-१८८, ७-२३८, ८-२५१, ९-२५७, १०-३०५.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-०-४९-२, उमेश यादव १०-०-७५-२, इशांत शर्मा ८-०-६६-२, आर. अश्विन १०-०-४७-०, रवींद्र जडेजा ९-१-३१-२, सुरेश रैना ६-०-३६-०.
सामनावीर : शिखर धवन.