विंडीजविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देऊन निवड समितीने ऋषभ पंतच्या खांद्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभकडे आपला खेळ दाखवण्याची चांगली संधी असल्याचं वक्तव्य कर्णधार रोहित शर्माने केलं आहे. निवड समितीने विंडीजविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देऊन रोहित शर्माची कर्णधारपदावर नियुक्ती केली आहे. याआधी झालेल्या कसोटी मालिकेत भारत २-० तर वन-डे मालिकेत ३-१ ने जिंकला आहे. त्यामुळे टी-२० मालिकेतही असाच खेळ करण्याचा निर्धार भारतीय संघाने व्यक्त केला आहे. दोन्ही संघांमधला पहिला टी-२० सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

“गेली अनेक वर्ष धोनी संघासाठी महत्वाचा खेळाडू म्हणून आपली भूमिका बजावतो आहे. मधल्या फळीत त्याचा अनुभव आम्हाला या मालिकेत मिळणार नाही, मात्र त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ आणि दिनेश कार्तिककडे आपला खेळ दाखवण्याची चांगली संधी आहे.” पहिल्या टी-२० सामन्याआधी रोहित पत्रकारांशी बोलत होता. विश्वचषकाचा विचार करत असताना तुम्हाला संघात पर्याय हवे असतात, या मालिकेतून प्रत्येक खेळाडूला विश्वचषकासाठीच्या संघात आपली दावेदारी पक्की करण्याची चांगली संधी असल्याचंही रोहित म्हणाला.

विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलिल अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम