क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात धोनीने ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा धोनी चौथा भारतीय तर १२ वा जागतिक फलंदाज ठरला आहे. मात्र धोनीच्या या विक्रमाला भारताच्या पराभवामुळे वादाची किनार लागलेली आहे. मोक्याच्या क्षणी धोनीने केलेल्या संथ खेळामुळे नाराज झालेल्या प्रेक्षकांनी मैदानातच धोनीची हुर्यो उडवली.

अवश्य वाचा – लॉर्ड्सच्या मैदानावर भारताची फलंदाजी ढेपाळली, इंग्लंड ८६ धावांनी विजयी

दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताला ८६ धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार कोहली आणि सुरेश रैनाने चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. ही जोडी माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात फलंदाजीसाठी आला. मात्र धोनीकडून अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नाही. धोनीने अतिशय संथ खेळ करत ५९ चेंडूत केवळ २ चौकारांसह ३७ धावा केल्या. अखेरच्या षटकात डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर धोनीले पहिले काही चेंडू धाव घेणं जमलं नाही, यामुळे नाराज झालेल्या प्रेक्षकांनी मैदानातच आपला राग व्यक्त केला.

मधल्या षटकांमध्ये बदली खेळाडू शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल धोनीसाठी एनर्जी ड्रिंक आणि बॅट घेऊन आले. यादरम्यान धोनीने आपली बॅटही बदलली. समालोचकांच्या मते ड्रेसिंग रुममधून धोनीला खेळाची गती वाढवण्याचा संदेश देण्यात आला होता. मात्र सामना संपल्यानंतर युझवेंद्र चहलने या वृत्ताचं खंडन केलं आहे. इंग्लंडकडून सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या जो रुटनेही धोनीच्या या पवित्र्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – धोनी दसहजारी मनसबदार, वन-डे क्रिकेटमध्ये गाठला दहा हजार धावांचा टप्पा