कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम सोमवारी महेंद्रसिंह धोनी याने मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत धोनीने शानदार खेळी खेळत रविवारी द्विशतक केले होते. सोमवारी धोनी २२४ धावांवर बाद झाला. 
कसोटीमध्ये भारतीय कर्णधाराचा सर्वोच्च धावांचा विक्रम आतापर्यंत सचिनच्या नावावर होता. सचिनने १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २१७ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतरचा आतापर्यंतचा कोणताही कर्णधार हा विक्रम मोडू शकला नव्हता. धोनीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत २२४ धावा काढल्या. दरम्यान, कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा ऍंडी फ्लॉवरचा विक्रम धोनी मोडू शकला नाही. फ्लॉवरने भारताविरुद्ध खेळताना २३२ धावा काढल्या होत्या.