आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत आज मंगळवार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगणार आहे. वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज ‘ख्रिसगेल’ला स्वस्तात बाद करण्याचा मनसुबा असल्याचे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच “ख्रिस गेलला जर बाद करण्यात आम्हाला अपयश आले, तर तो सामना एकतर्फी खेचून नेईल” असे व्यक्त करत गेलच्या तुफानी फलंदाजीचे भारतीय संघावर सावट असल्याचेही धोनीने स्पष्ट केले.
मालिकेच्या दोन्ही सराव सामन्यात मिळालेले यश आणि पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावरील विजय बघता भारतीय संघ चांगली कामगिरी करेल असा विश्वासही धोनीने व्यक्त केला. कॅप्टनकुल धोनी म्हणाला, “ख्रिस गेल हा असा फलंदाज आहे की, ज्याच्या फलंदाजीने सामन्याच्या निकालात मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे त्याला लवकर बाद करणे चांगले ठरेल. तसेच नव्या नियमांनुसार सामन्यात दोन नवीन चेंडू मिळणार असल्याने संघातील वेगवान गोलंदाजांना ‘गेल’ला बाद करण्याची उत्तम संधी आहे.”
आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे प्रकरणाचा दबावही संघावर आहे. तरीसुद्धा भारतीय संघाने आपली विजयी मालिका सुरू ठेवली आहे. यावर धोनीने स्पष्ट केले, “संघाचे संपुर्ण लक्ष चॅम्पियन्स करंडक सामन्यांकडे आहे आणि त्यामुळे आम्ही सरावात मग्न असतो. मायदेशी कोणत्या बातम्या सुरु आहेत याची कोणतीही माहिती आम्हाला नाही.”