News Flash

नेहराची शिस्तबद्धता आणि युवराजचा दृष्टिकोन भावतो -धोनी

बरोब्बर वर्षभरापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक खेळला.

| February 26, 2016 04:26 am

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी

बरोब्बर वर्षभरापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक खेळला. त्या वेळी युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघात काही काळाने युवराज सिंग पुनरागमन करेल, असे कुणी म्हटले असते तर कुणाचाही विश्वास बसला नसता. आशीष नेहराच्या बाबतीत तर परिस्थिती आणखी बिकट होती. २०११मधील भारताच्या विश्वविजयानंतर तो भारतीय क्रिकेटमधून हद्दपारच झाला होता. मात्र पुन्हा एकदा भारतीय संघाची निळी जर्सी घालण्याचे भाग्य त्याला लाभले आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाच्या दृष्टीने ३६ वर्षीय नेहरा आणि ३४ वर्षीय युवराज हे संघनायक महेंद्रसिंग धोनीसाठी महत्त्वाचे आहेत. नेहराची शिस्तबद्धता आणि युवराजचा दृष्टिकोन मला भावतो, अशा शब्दांत धोनीने सामन्यानंतर दोघांचे कौतुक केले.

आशिया चषक स्पध्रेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील युवराजच्या १५ धावांच्या खेळीविषयी धोनी म्हणतो, ‘‘युवराजचा दृष्टिकोन अतिशय छान होता. प्रत्येक चेंडूच्या दर्जानुसार त्याला उत्तर द्यायचे असते. त्याच्या या खेळीतसुद्धा आत्मविश्वास प्रकर्षांने जाणवत होता. तो जितका अधिक खेळेल, तितका त्याच्या खेळ अधिकाधिक समृद्ध होत जाईल. त्याला अधिक वेळ द्यायची गरज आहे.’’
डावखुरा वेगवान गोलंदाज नेहराविषयी धोनी म्हणाला, ‘‘मैदानावर शंभर टक्के तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हे नेहराचे वैशिष्टय़ आहे. ३६व्या वर्षी गोलंदाजी आणि तंदुरुस्तीबाबतची शिस्त ही त्याच्यात पाहायला मिळते.
‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकार नेहरासाठी अनुकूल आहे. तीन-साडेतीन तास मैदानावर क्षेत्ररक्षण करणे नेहरासाठी कठीण आहे. त्यामुळे ५० षटकांच्या क्रिकेटसाठी तो योग्य नाही,’’ असे धोनीने सांगितले.

मी शास्त्रशुद्ध फलंदाज -पंडय़ा
तडाखेबंद फलंदाजीसह उपयुक्त गोलंदाजी करणारा खेळाडू म्हणून हार्दिक पंडय़ाची ओळख होऊ लागली आहे. आशिया चषकात बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत हार्दिकने १८ चेंडूंत ३१ धावांची खेळी करत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. खुद्द पंडय़ाने मात्र मी शास्त्रशुद्ध फलंदाज आहे, धावगती वाढवण्यासाठी बढती देण्यात आलेला फलंदाज नाही, असे म्हटले आहे.
‘‘आक्रमक शैली नैसर्गिक आहे. आतापर्यंत याच पवित्र्यासह मी खेळतो आहे. पिंच हिंटर म्हणून मला पाठवण्यात आलेले नाही. मी रीतसर फलंदाज आहे. त्यामुळेच कसे खेळावे यासंदर्भात मला सूचना देण्यात आलेल्या नाहीत. संघाची आवश्यकता आहे, त्या धावगतीसह मी खेळू शकलो याचे समाधान आहे,’’ असे हार्दिकने सांगितले.

३६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणाऱ्या आशीष नेहराचे वय म्हणजे केवळ एक आकडा अआहे. चेंडूचा वेग आणि दिशा यामध्ये प्रभावी बदल करत तो फलंदाजांना अडचणीत टाकत आहे. पुनरागमनानंतर त्याने भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
-सुनील गावस्कर,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 4:26 am

Web Title: dhoni hails ashish nehras discipline yuvraj singhs approach
टॅग : Dhoni
Next Stories
1 एफ-वन शर्यतीतील बदलांवर हॅमिल्टन नाराज
2 ‘दबंगांची भाऊबंदकी’
3 बंगळुरूला नमवत मुंबई दुसऱ्या स्थानी; पाटण्याकडून दिल्लीचा धुव्वा
Just Now!
X