भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वोत्तम सामना जिंकून देणारा फलंदाज म्हणून ओळखला जात आहे. मात्र माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते विश्वचषक विजेता कर्णधार धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला असता तर अधिक घातक ठरला असता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष असलेल्या गांगुलीने धोनीला ३९व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘जागतिक क्रिकेटमधील एक महान खेळाडू म्हणून ख्याती असलेला धोनी तळाच्या क्रमांकावर फलंदाजी करून भारताला सामने जिंकून देतो. पण धोकादायक फलंदाज असल्यामुळे त्याने फलंदाजीला वरच्या क्रमांकावर उतरायला हवे,’’ असे गांगुलीने सांगितले.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध पदार्पण करणाऱ्या धोनीच्या पाकिस्तानविरुद्धच्या १४८ धावांच्या खेळीविषयी गांगुली म्हणाला की, ‘‘धोनीची ती खेळी अप्रतिम होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये महान खेळाडू दडपणाखालीच चांगली कामगिरी साकारतात. धोनी हा त्यापैकीच एक आहे.’’

भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘मैदानावर उतरला की तो प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत असतो. त्याची खेळ आणि खेळाडूंना समजून घेण्याची कला अद्वितीय आहे. त्यामुळेच आमची जोडी मैदानाबाहेरही चांगली जमली. मैदानावर सल्ला देण्यासाठी तो सर्वप्रथम समोरच्या खेळाडूचे म्हणणे ऐकून घेत असतो. मदतीसाठीही तो नेहमीच पुढे असतो,’’ असे कोहलीने सांगितले.

धोनीला व्यक्तिश: शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक आणि कृणाल हे पंडय़ा बंधू बडोद्याहून विमानाने रांचीला दाखल झाले आहेत. ‘‘धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत हार्दिकने कारकीर्द घडवली आहे. या दोघांमध्ये विशेष असे नाते आहे. रांचीला जाणारी विमानांची संख्या कमी असल्यामुळे हार्दिक आणि कृणालने विमानाने रांचीला जाण्याचा निर्णय घेतला,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारताचा फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जसमधील सहकारी केदार जाधवने भावनिक पत्र लिहून धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘दरवर्षी तुझ्या वाढदिवसाला आपण एकत्र असतो. पण यंदा करोनामुळे ते शक्य झाले नाही. तू नेहमीच मला दिशा दाखवत माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलास. गेली १५ वर्षे तू क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता माझ्यासकट सर्वानाच तुला पुन्हा खेळताना पाहायचे आहे,’’ असे केदारने पत्रात म्हटले आहे.

धोनी सेंद्रिय शेतीमध्ये व्यग्र

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान  जाहिराती आणि क्रिकेट दोन्हीही बंद असताना महेंद्रसिंह धोनीने सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला आहे. वर्षभर क्रिकेटपासून दूर असणारा धोनी आपल्या रांचीतील जमिनीमध्ये सेंद्रिय शेती करत आहे. ‘‘देशभक्ती धोनीच्या रक्तातच भिनली आहे. आपल्या ४० ते ५० एकर जमिनित धोनी सध्या पपई आणि केळीचे पिक घेत आहे. लवकरच तो निओ ग्लोबल या आपल्या कंपनीच्या नावाने नवीन बियाणे सादर करणार आहे. लोकांचे आयुष्य पूर्वपदावर येईपर्यंत तो कोणत्याही जाहिराती किंवा कार्यक्रमात दिसणार नाही,’’  असे त्याचा मित्र आणि व्यवस्थापक मिहिर दिवाकरने सांगितले.