भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोडल्यानंतर महेंद्रसिंह धोनी अनेकदा मैदानात कर्णधार विराट कोहलीसह सहकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना दिसतो. त्यामुळेच भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघासोबत एक नव्हे तर दोन कर्णधारासह मैदानात उतरतो, असा तर्कही नेटकऱ्यांनी लावल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली कोणताही निर्णय घेण्यापूर्वी धोनीचा सल्ला घेतो. दुसऱ्या टी-२० सामन्यातही हे चित्र पाहायला मिळाले. मात्र, यावेळी धोनीचा फसलेला अंदाज ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या पाचव्या षटकात कर्णधार विराट कोहलीने भुवनेश्वरच्या हाती चेंडू सोपवला. या षटकातील भूवीचा चौथा चेंडू हेन्रिकेच्या बॅटची कड घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. विराट आणि भुवनेश्वरने जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी अपिल फेटाळून लावले. पंचांनी अपील फेटाळल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता विराट कोहलीनं डीआरएस परफेक्शनिस्ट धोनीकडे पाहिले. मात्र, धोनीनं त्याला डीआरएस न घेण्याचा सल्ला दिला. विराटला चेंडू बॅटला लागल्याची पूर्ण खात्री होती. त्यामुळे तो डीआरएस प्रणालीचा उपयोग करण्याच्या मनस्थितीत होता. परंतु धोनीच्या नकारार्थी इशारामुळे त्याने डिआरएस घेण्याचा निर्णय बदलला.

पण टिव्ही रिप्लायमध्ये चेंडूने बॅटची कड घेतल्याचे साफ दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी हेन्रिके अवघ्या २ धावावर खेळत होता. त्यानंतर त्याने नाबाद ६२ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. धोनीचा डिआरएसबाबतचा अंदाज सहसा चुकत नाही. कोहलीनं यापूर्वी देखील डिआरएसच्यावेळी धोनीचा सल्ला अधिक महत्त्वाचा असतो, असे सांगितले आहे. विराट म्हणाला होता की, धोनीने डीआरएसची मागणी केल्यानंतर ९५ टक्के निर्णय हे भारताच्या बाजूने लागले आहेत. त्यामुळे त्याचा निर्णयाला साहजिकच अधिक महत्त्व असते.