भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) लोकप्रिय खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामनिर्देशन लाभले आहे. १३ डिसेंबरला होणाऱ्या आयसीसीच्या १०व्या वार्षिक पुरस्कार समारंभात विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
‘‘लोकप्रिय खेळाडूच्या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क, इंग्लंडचा अ‍ॅलिस्टर कुक, दक्षिण आफ्रिकेचा ए बी डी’व्हिलिर्स तसेच भारताचे धोनी आणि कोहली शर्यतीत आहेत,’’ असे आयसीसीने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
कोहली आणि धोनी या दोघांनीही आपल्या कारकिर्दीत आयसीसीचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. २०१२मध्ये कोहलीने सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूचा पुरस्कार संपादन केला. याचप्रमाणे धोनीने हाच पुरस्कार २००८ आणि ०९ या दोन्ही वर्षी मिळवण्याची किमया साधली.
क्रिकेटरसिकांनी आपला कौल नोंदवावा, असे आवाहन आयसीसीकडून करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत क्रिकेटचाहत्यांना आपला कौल देता येईल. १३ डिसेंबरला एलजी आयसीसी पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. आयसीसी पुरस्कारांची घोषणा ११ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. ७ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१३ या कालावधीतील कामगिरीचा या पुरस्कारांसाठी विचार करण्यात येणार आहे.