भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू मोहींदर अमरनाथ यांनी महेंद्रसिंह धोनीला, स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी धोनीला संघातून वगळण्यात आलं होतं. त्यामुळे बीसीसीआय विश्वचषकापर्यंत धोनीचा केवळ वन-डे क्रिकेटसाठी विचार करणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे संघात आपलं स्थान टिकवायचं असेल तर धोनीने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत राहणं गरजेचं असल्याचं अमरनाथ यांनी स्पष्ट केलं. मध्यंतरीच्या काळात धोनीला विजय हजारे करंडकात झारखंडकडून खेळण्याची संधी होती, मात्र धोनीने न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

“प्रत्येक खेळाडू हा दुसऱ्या खेळाडूपेक्षा वेगळा असतो. पण तुम्हाला भारतीय संघाकडून खेळत रहायचं असेल तर तुम्ही स्थानिक क्रिकेटमध्ये तुमच्या राज्याच्या संघाकडून खेळत राहणंही तितकच गरजेचं आहे. यासाठी बीसीसीआयने आपल्या धोरणात बदल करणं गरजेचं आहे. अनेक सिनीअर खेळाडू संधी असतानाही स्थानिक क्रिकेटकडे दुर्लक्ष करतात, पण असं करणं योग्य नाही.” अमरनाथ एका खासगी कार्यक्रमात पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. शिखर धवननेही रणजी हंगामात खेळण्याची संधी असताना सहभागी न होणं पसंत केलं होतं. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनीही हाच पर्याय सुचवला होता.

जर तुमची भारतीय संघात निवड झाली नसेल तरीही तुम्ही तुमच्या राज्याच्या संघाकडून खेळत राहणं गरजेचं आहे. असं केल्यास तुमची संघात निवड होईल, असा नियम बीसीसीआयने करणं गरजेचं आहे. तुम्ही याआधीच्या सामन्यांमध्ये किती चांगली कामगिरी केली आहेत हे आता फारसं लक्षात घेतलं जात नाही. आता तुमचा फॉर्म कसा आहे हे पाहणंही तितकच महत्वाचं आहे. अमरनाथ यांनी आपलं मत मांडलं. भारताला 1983 साली विश्वचषक जिंकवून देण्यात मोहींदर अमरनाथ यांचा मोलाचा वाटा होता.