भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंग धोनीचा खेळ मी सातत्याने पाहात असतो. यष्टीरक्षण आणि तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर तो ज्या पद्धतीने सामन्याचे चित्र पालटवतो ते अविस्मरणीय आहे. मी त्याच्याकडून असंख्य गोष्टी शिकतो. त्याच्याप्रमाणे संघाला सामने जिंकून द्यायचे आहेत, असे मत पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज सर्फराझ खानने व्यक्त केले.
‘भारतात खेळण्याची संधी अनोखी आहे. संघाच्या आवश्यकतेनुसार क्रमांकावर मी फलंदाजीला येतो. संघाच्या विजयात योगदान देणे महत्त्वाचे आहे. क्रमांक कुठला हे फारसे महत्त्वाचे नाही’, असे सर्फराझने सांगितले.
बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया चषकातील कामगिरीविषयी विचारले असता सर्फराझ म्हणाला, ‘बांगलादेशमधील खेळपट्टय़ा आव्हानात्मक होत्या. प्रत्येक संघाला गवत असलेल्या खेळपट्टीवर खेळताना अडचण जाणवली. मात्र भारतातील खेळपट्टय़ा वेगळ्या स्वरूपाच्या असतील.’