Asia Cup 2018 : भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सुपर ४ फेरीतील सामना बरोबरीत सुटला. बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले. २५३ धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि भारताचे सर्व गडी तंबूत परतले. रशीद खानने दडपणाच्या क्षणी उत्तम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला मानसिक विजय मिळवून दिला.तसेच शतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद शेहजादला सामनावीर जाहीर करण्यात आले.

या सामन्यात आणखी एक लक्षवेधी गोष्ट ठरली ती म्हणजे महेंद्र सिंग धोनी याचे नेतृत्व. धोनीला तब्बल २३ महिन्यांनंतर एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करायला मिळाले. त्यामुळे धोनी या सामन्यात किती धावा करतो, हे देखील साऱ्यांना पाहायचे होते. पण दुर्दैवाने धोनीला केवळ ८ धावा करता आल्या. त्यामुळे त्याला खुणावणारा एक विक्रम अजूनही लांब असल्याचेच दिसून आले. मात्र आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धोनी हा विक्रम करेल का? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. हा विक्रम म्हणजे १० हजार धावांचा पल्ला.धोनीला हा टप्पा गाठण्यासाठी केवळ ८७ धावा कराव्या लागणार आहेत. या धावा करताच तो वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठेल आणि तेंडुलकर, द्रविड व गांगुली यांच्यानंतर हा पल्ला गाठणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ४६३ सामन्यांत १८,४२६ धावा केल्या आहेत. त्यानंतर माजी कर्णधार गांगुली याने ३०८ सामन्यांत ११,२२१ आणि द्रविडने ३४० सामन्यांत १०,७६८ धावा केल्या आहेत. धोनीच्या ३२२ सामन्यांत ९,९१३ धावा आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात आवश्यक धावा करून धोनी तेंडुलकर, द्रविड आणि गांगुली यांच्या पंक्तीत स्थान मिळवतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.