News Flash

धोनीसह संघाला प्रोत्साहन देण्याचा राम बाबूचा वसा

यावेळी वानखेडेवर मात्र सुधीरच्या बाजूलाच त्याच्यासारखी वेशभूषा केलेली आणखी एक व्यक्ती लक्ष वेधते. त्याची वेशभूषा

| November 15, 2013 03:39 am

स्टेडियममध्ये जाऊन आपल्या देशाला प्रोत्साहन देण्याची इच्छा साऱ्यांचीच असते, पण त्यामध्ये आपल्या आवडत्या खेळाडूसाठी प्रत्येक सामन्याला जाऊन त्याचे नाव अंगावर कोरून घेणारे क्रिकेटप्रेमी ओघानेच सापडतात. सचिनप्रेमापोटी भारताच्या प्रत्येक सामन्याला स्टेडियममध्ये हजर असणारा क्रिकेटरसिक सुधीर गौतम सर्वानाच माहीत आहे. अंगावर तिरंग्यांचा रंग आणि त्यावर सचिनचे नाव यांच्यासह तो तिरंगा फडकावत संघाला प्रोत्सादन देत असतो. पण यावेळी वानखेडेवर मात्र सुधीरच्या बाजूलाच त्याच्यासारखी वेशभूषा केलेली आणखी एक व्यक्ती लक्ष वेधते. त्याची वेशभूषा सुधीरसारखी असली तरी महत्त्वाचा फरक म्हणजे त्याच्या अंगावर धोनीचे नाव कोरलेले आहे.
क्रिकेट हे चंडीगढच्या राम बाबूसाठी सर्वस्व. भारताला दोन विश्वचषक जिंकवून देण्याची किमया साधणारा महेंद्रसिंग धोनी हा त्याला मनापासून आवडतो. त्यामुळे त्याने धोनीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले. धोनीच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावून संघाला जाऊन प्रोत्साहन द्यायचे आणि धोनीचा राजदूत व्हायचे हे राम बाबूने ठरवले आहे. सचिनच्या ऐतिहासिक दोनशेव्या कसोटीला तो वानखेडेवर झळकला आणि प्रकाशझोतात आला. धोनी आणि भारताच्या विजयासाठी आजन्म प्रार्थना करण्याचा वसा घेतला असल्याचे राम बाबू म्हणत होता.
‘‘मी क्रिकेट खेळायचो, पण मला क्रिकेटपटू बनता आले नाही. १९९६पासून मी मोहालीच्या मैदानात क्रिकेट मैदानात सामने पाहायचो. धोनीची फलंदाजी, नेतृत्व पाहिले आणि मी त्याचा चाहता झालो. २००७चा ट्वेन्टी-२० विश्वचषक विजय डोळ्याचे पारणे फेडणारा होता, धोनीने आपली विजयीसेना बनवली आणि जिद्दीच्या जोरावर त्याने विश्वचषक जिंकला आणि माझ्या धोनीप्रेमात आणखी भर पडली. त्यानंतर २००८पासून मोहालीच्या सामन्यांवेळी मी शरीराला रंग लावून हजेरी लावायला सुरुवात केली आणि इथपर्यंत पोहोचलो,’’ असे राम बाबू सांगत होता.
वानखेडेवर सुधीरच्या बाजूला बसूनच तो संघाचा उत्साह वाढवत होता. पण या दोघांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. कारण दोघांनाही खेळाडूंच्या चमकदार कामगिरीपेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा आहे. अंगाला तिंरग्याचा रंग फासून हातामध्ये तिंरगा फडकवत राम बाबूही सुधीरसह भारतीय संघाला शुभेच्छा देत होता. सामन्याचे तिकीट तुला कसे मिळते, यावर रामबाबू म्हणाला की, ‘‘सुरुवातीला स्वत: तिकीट विकत घ्यायचो, पण रांचीला गेल्यावर मी धोनीची घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्याने मला तिकीट देण्याचे वचन दिले आणि आपले वचन तो अजूनही पाळत आहे.’’
रंगरंगोटी करण्यासाठी किती वेळ आणि पैसा लागतो, असे विचारल्यावर राम बाबूने या सामन्याच्या वेळेचाच किस्सा सांगितला. ‘‘मुंबईत आल्यावर मी रंग काम करणाऱ्या व्यक्तीला शोधत होतो. मला रात्री ८ वाजता एक इसम रंग लावणारा भेटला. त्यानंतर त्याने जे काम सुरू केले ते मध्यरात्रीचे चार वाजेपर्यंत. त्यानंतर मी वानखेडेपासून लांब असल्याने मित्राच्या घरून निघालो आणि स्टेडियमवर सहा वाजताच आलो. हे रंगकाम करण्यासाठी एका वेळेला हजार ते दीड हजार रुपयांचा खर्च येतो आणि खर्च मी कुणाकडूनही घेत नाही.’’
जेव्हा सामने नसतात तेव्हा तू काय करतोस, यावर राम बाबू म्हणाला की, ‘‘चंडीगढमध्ये ‘पिझ्झा हट’मध्ये काम करून पैसे कमावतो, घरी सारे आलबेल असल्याने त्यांना माझ्या मिळकतीबाबत जास्त काही वाटत नाही. त्याचबरोबर मी हे जे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो, त्यालाही त्यांचा विरोध नाही.’’
आता यापुढे काय करायचा मानस आहे, असे विचारल्यावर तो म्हणाला की, ‘‘माझा जन्म क्रिकेटसाठी झाल्याचे मला वाटते. त्यामुळे धोनीसह संघाला प्रोत्साहन देण्याचा वसा मी कायम जपणार आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 3:39 am

Web Title: dhoni painted on body ram babus presence catches eyes on wankhede stadium
Next Stories
1 सेहवाग, झहीर, हरभजनला डच्चू
2 धवलची माघार
3 रात्र वैऱ्याची आहे!
Just Now!
X