शायर म्हणजे कवी किंवा शब्दरचनाकार. महेंद्रसिंह धोनी हा मैदानी डावपेच कुशलतेने रचणारा ‘रणनीतीकार’. त्याच्या संस्मरणीय क्रिकेटमय कवनांची चाहत्यांनी तब्बल १५ वर्षे निस्सीम अनुभूती घेतली. आपल्या आवडत्या खेळाला निरोप देतानाही त्याने त्याच्यातील वेगळेपणाची झलक दिली. ‘मै पल दो पल का शायर हूँ..’ या गाण्यावर आपल्या क्रिकेट कालखंडातील महत्त्वाच्या क्षणांचा वेध घेणारी ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर टाकत धोनीने सायंकाळी सात वाजून २९ मिनिटांनी कारकीर्दीपुढे पूर्णविराम दिला.

‘‘माझ्या संपूर्ण कारकीर्दीतील लाभलेले तुमचे प्रेम आणि पाठींब्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांपासून मी निवृत्त असेन,’’ अशी पोस्ट ‘इन्स्टाग्राम’वर टाकली आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धोनीने निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी इंडियन प्रीमियर लीग खेळत राहणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीनदा ‘आयपीएल’ चषक जिंकला आहे.

‘रांचीचा राजपुत्र’ असे बिरुद मिरवणाऱ्या धोनीने ३५० एकदिवसीय, ९० कसोटी आणि ९८ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात धावांसाठी झगडणाऱ्या धोनीवर बरीच टीका झाली; परंतु पाचव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करूनही त्याच्या खात्यावर ५०हून अधिक धावसरासरीनिशी १०,७७३ धावा जमा होत्या.

२००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात अखेरचे षटक जोगिंदर शर्माकडे देण्याचा निर्णय आश्चर्यकारक आणि फलदायी ठरला होता. याचप्रमाणे २०११च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या युवराज सिंगच्या आधी फलंदाजीला उतरण्याचा निर्णयही यशस्वी ठरला होता. हे दोन्ही विश्वचषक भारताने जिंकले होते.

क्षणचित्रे

*  ३९ वर्षे आणि ३९व्या दिवशी निवृत्तीचा निर्णय.

*  २००८ आणि २००९मध्ये वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित.

राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरव.

*  धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००९मध्ये प्रथमच कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळवले.

*  कारकीर्दीतील पहिल्या आणि अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात धावचीत झालेला कदाचित धोनी एकमेवच.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२००४ ते २०१९

पहिला सामना

२३ डिसेंबर, २००४ विरुद्ध बांगलादेश

शेवटचा सामना

१० जुलै, २०१९ विरुद्ध न्यूझीलंड

धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

प्रकार   सामने  धावा   १००/५० झेल/यष्टीचीत

कसोटी  ९० ४,८७६  ६/३३   २५६/३८

एकदिवसीय  ३५० १०,७७३ १०/७३  ३२१/१२३

ट्वेन्टी-२०   ९८ १,६१७  ०/२ ५७/३४

आज एक पर्व संपले. धोनीसारखा खेळाडू क्रिकेट जगताला लाभला, हे खरेच आपले भाग्य. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्यासारखे नेतृत्व कुणीही करू शकणार नाही. निवृत्तीच्या निर्णयाबाबत त्याच्या मनात काहीही शंका नसेल, अशी आशा आहे. धोनी तुला उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा!

– सौरव गांगुली, ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष

धोनी तू भारतासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. २०११च्या विश्वचषकाचे जेतेपद माझ्या कारकीर्दीतील मौल्यवान क्षण होता. त्या स्वप्नपूर्तीत तुझा सिंहाचा वाटा होता. आयुष्यातील दुसऱ्या डावासाठी तुला शुभेच्छा!

– सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

धोनीची जागा घेणे भविष्यातही कोणाला जमणार नाही. भारतीय क्रिकेटला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्याचे श्रेय धोनीलाच जाते. तुझ्यासह ड्रेसिंग रूममध्ये घालवलेला वेळ कायम लक्षात राहिल.

– रवी शास्त्री, भारताचे प्रशिक्षक

आयुष्यातील अखेरच्या क्षणाला मला कोणी विचारले की तुझी शेवटची इच्छा काय, तर मी धोनीने विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी लगावलेला षटकार पाहायचा आहे, असेच सांगेन. धोनी तुझी निवृत्ती मनाला हळहळ लावून गेली.

– सुनील गावस्कर, माजी क्रिकेटपटू