इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी केली आहे, तसेच त्यांनी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वक्षमतेबाबतही साशंकता व्यक्त केली आहे.

लॉर्ड्स मैदानावरील अवघड खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंनी सनसनाटी विजय मिळविला होता. तशीच मालिका कायम ठेवण्यात फ्लेचर यांना अपयश आले आहे. त्यांच्याकडे कल्पनाशक्ती व दूरदृष्टीचा अभाव आहे. फ्लेचर यांनी आपणहून पदावरून दूर होण्याची वेळ आली आहे. धोनीने फलंदाजीच्या शैलीत सुधारणा केली, मात्र त्याने नेतृत्वशैलीत योग्य तो बदल केला नाही. संघातील अंतिम ११ खेळाडूंची निवड, क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना याबाबत त्याने अक्षम्य चुका केल्या आहेत.
 -अजित वाडेकर, माजी कर्णधार

प्रत्येक वेळी चमत्कार घडविता येतो, अशा भ्रमात राहून धोनी हा खूप गाफील राहिला. अवघड परिस्थितीतून प्रत्येक वेळी नशिबाची साथ मिळतेच असे नाही. त्याचे नेतृत्व व यष्टीरक्षण याबाबत मी समाधानी नाही. पुन्हा पुन्हा त्याच्याकडून त्याच त्याच चुका होतात तरीही त्याने आपल्या चुका टाळण्यासाठी प्रयत्न केलेला नाही.
-गुंडाप्पा विश्वनाथ, माजी कर्णधार

फ्लेचर यांनी भारतीय संघासाठी काहीही केलेले नाही. संघातील अंतिम ११ खेळाडूंची निवड त्यांनी योग्य रितीने केलेली नाही. रविचंद्रन अश्विनला योग्य संधी दिली नाही.
-कृष्णम्माचारी श्रीकांत, निवड समितीचे माजी अध्यक्ष

लॉर्ड्सवरील पराभवापासून बोध घेत जर इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक हा आपल्या शैलीत सुधारणा करू शकतो तर मग आपल्या संघातील युवा खेळाडूंना हे तंत्र का जमले नाही याचेच आश्चर्य वाटते. संघाच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जात नसेल तर अशा सूचना देण्याचा उपयोग तरी काय. लॉर्ड्सवर विजय मिळविल्यानंतर भारताची कामगिरी प्रत्येक सामन्यात खराब होत गेली.
– चंदू बोर्डे, ज्येष्ठ क्रिकेटपटू व व्यवस्थापक

प्रशिक्षक म्हणून संघातील चुकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशिक्षकांकडून होणे अपेक्षित असते. मात्र तसा प्रयत्न फ्लेचर यांच्याकडून झालेला दिसत नाही. प्रशिक्षक म्हणून मी अनेक वर्षे काम केले आहे. फ्लेचर यांच्याकडून प्रयत्न झाला असेल, जर कदाचित खेळाडूंूनी त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी केली नसेल तर ही खरोखर गंभीर गोष्ट आहे. घोडय़ाला भले तुम्ही पाण्यापाशी न्याल, पण तो पाणीच प्यायला नाही तर तो तहानलेलाच राहणार.
-अंशुमन गायकवाड, माजी सलामीवीर व प्रशिक्षक

धोनी याची कसोटी कर्णधार म्हणून कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. एकदिवसीय व ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये तो चांगला कर्णधार असेल, मात्र कसोटीत त्याच्या नेतृत्वशैलीला मर्यादा आहेत हे आता दिसून आले आहे.
-अशोक मल्होत्रा, माजी कसोटीपटू

आता तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कसोटी सामन्यांना महत्त्व देईल अशी अपेक्षा आहे. दोन कसोटींमध्ये एकही सराव सामना नव्हता. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा सूर सापडणे कठीण गेले. प्रतिस्पर्धी संघाचे वीस बळी घेण्याची क्षमता आपल्या गोलंदाजांकडे नाही हे दिसून आले आहे. संघनिष्ठा, चिवट लढत देण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द, आत्मविश्वास याचा अभाव आपल्या खेळाडूंमध्ये दिसून आला आहे. संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यासह सर्व सहाय्यकांची ताबडतोब हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाकरिता स्वतंत्र प्रशिक्षक असून ते इंग्लंडमध्ये काय करीत बसले होते, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली पाहिजे.
-दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार