भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्टला संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच धोनीचा सहकारी सुरेश रैना यानेही निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. धोनीने २०१९मध्ये विश्वचषकात आपला शेवटचा सामना खेळला होता. २०१८ मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना आणि २०१५ मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने धोनी आणि रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

धोनी-रैना जोडीने एकत्र निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतातील प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाला सलाम केला. अतिशय कल्पक आणि उत्तमपणे साकारलेल्या वाळूशिल्पाच्या माध्यमातून त्यांनी धोनी-रैना दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ओडिशामधील पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी वाळूशिल्प साकारले. या वाळूशिल्पात त्यांनी धोनी आणि रैना यांचा वाळूने चेहरा तयार केला. त्याच्या वरच्या बाजूला बॅट तयार करून त्यावर ‘आम्ही तुमची मैदानावरील फटकेबाजी मिस करू’, असा संदेश लिहिला. तसेच, Incredible Dhoni आणि Amazing Raina असं त्या दोघांचं वर्णनही केलं.

पटनायक यांच्या त्या वाळूशिल्पाचा फोटो थेट ICCने ट्विट केला. त्या फोटोबाबत लिहिताना ICCने पटनायक यांच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक केले. पटनायक यांनी ICCची ती पोस्ट रिट्विटदेखील केली.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने २०१९च्या विश्वचषकात जुलै महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर त्याने दोन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही त्याला संघात स्थान न मिळाले नाही. सुरेश रैनाने १७ जुलै २०१८ मध्ये शेवटचा वन डे सामना खेळला. त्यानंतर त्याला टी-२० संघात स्थान मिळेल अशी आशा होती, पण तसं न घडल्याने त्याने आणि धोनीने १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली.