भारत-बांगलादेश यांच्यात रंगणाऱ्या पहिल्यावहिल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यासाठी महेंद्रसिंह धोनी समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता होती. परंतु धोनी अद्यापही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) करारबद्ध असल्याने त्याला समालोचन करता येणार नाही, असे धोनीशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीने बुधवारी सांगितले.

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर २२ नोव्हेंबरपासून भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. ‘‘३८ वर्षीय धोनी विश्वचषकानंतर क्रिकेटपासून दूर असला तो अद्यापही ‘बीसीसीआय’चा करारबद्ध खेळाडू आहे. त्यामुळे धोनी कदापिही समालोचन करू शकत नाही,’’ असे त्या व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवरून प्रसार माध्यमांना सांगितले.

मंगळवारीच धोनी भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटीसाठी समालोचन करण्याची शक्यता असल्याचे वृत्त पसरले होते. परंतु हा परस्पर हितसंबंधांचा विषय असल्याने धोनी त्यामध्ये अडकणार नाही, असेही त्या व्यक्तीने सांगितले. परंतु धोनीच्या भविष्यातील योजनांविषयी आपल्याला काहीही कल्पना नसल्याचेही त्या इसमाने सांगितले.