प्रेक्षकांचे वर्तन गांभीर्याने घेऊ नये – धोनी

प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीबाबत अनेकांनी आपली नाराजी प्रकट केली आहे. मात्र भारताचा ट्वेन्टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र प्रेक्षकांचे वर्तन गांभीर्याने घेऊ नये, असे मत प्रकट केले आहे. प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकल्या, हे फार गंभीरपणे घेऊ नये, त्यांनी गमतीने फेकल्या, अशी प्रतिक्रिया धोनीने व्यक्त केली आहे.

‘‘आम्ही अशा गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. विशाखापट्टणम् येथे आम्ही काही वर्षांपूर्वी खेळलो होतो. आम्ही तो सामना आरामात जिंकलो, तरीही प्रेक्षकांनी बाटल्या फेकल्या होत्या. पहिल्या बाटलीने सुरुवात झाली आणि मग प्रेक्षकांनी गमतीने आणखी बाटल्या मैदानावर टाकल्या,’’ असे धोनीने सांगितले. परंतु खेळाडूंच्या सुरक्षेशी मात्र तडजोड केली जाणार नाही, असे त्याने पुढे सांगितले. ‘‘खेळाडूंच्या सुरक्षेचा जेव्हा प्रश्न उद्भवतो, तेव्हा मला असे वाटत नाही की फार मोठा धोका असू शकेल. प्रेक्षकांमधील काही बेभान व्यक्तींनी मैदानावर बाटल्या टाकल्या. त्यामुळे सुरक्षेसाठी पंचांनी आम्हाला मैदानावर मध्यभागी किंवा मैदानाबाहेर थांबण्याचे संकेत दिले,’’ असे धोनीने सांगितले.

‘‘आमचा खेळ चांगला झाला नाही, म्हणून या प्रतिक्रिया उमटल्या. पहिल्या काही बाटल्या या गांभीर्याने याच विचाराने फेकलेल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व बाटल्या प्रेक्षकांनी फक्त गंमत म्हणून फेकल्या,’’ असे त्याने पुढे सांगितले.दक्षिण आफ्रिकेचा ट्वेन्टी-२० संघनायक फॅफ डय़ू प्लेसिसने या घटनेबाबत तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली. याचप्रमाणे ७२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीच्या भारत दौऱ्यात अशी घटना पुन्हा घडू नये, अशी आशा प्रकट केली. ‘‘या घटना नक्कीच चांगल्या नसतात. मी भारतात गेली ५-६ वष्रे खेळतो आहे आणि मला अशा प्रकारचे प्रेक्षकांचे वर्तन कधीच पाहायला मिळाले नव्हते. या घटना खेळाच्या मैदानावर घडाव्यात, असे कुणालाही वाटत नाही. तुम्ही स्पर्धात्मकता म्हणून कुठेही खेळता, त्यामुळे सर्वोत्तम संघ हाच जिंकतो,’’ असे प्लेसिसने सांगितले.

‘‘जगात कोणत्याही ठिकाणी आम्ही खेळायला गेलो तरी खेळाडूंची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. सध्या तरी तो वाईट दिवस होता, एवढेच म्हणू शकतो,’’ असे त्याने पुढे सांगितले.

‘पराभवामुळे आत्मपरीक्षणाची संधी’

’ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये बुद्धिचातुर्यास फारसा वाव नसतो, याची जाणीव मला झाली आहे. दोन्ही सामने गमावल्यांमुळे आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे, असे भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

’‘‘क्रिकेट मोसमात एखाद्या सामन्यात आमची कामगिरी अपेक्षेइतकी होत नाही. अर्थात असे पराभव काही वेळा आवश्यक असतात. त्यामुळे आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी योग्य दिशा मिळते, असे सांगून धोनी म्हणाला, मी या दोन्ही सामन्यांमध्ये खूपच विचार करीत निर्णय घेतले. सुरुवातीला मी संथ खेळलो. त्याऐवजी मी आक्रमक पवित्रा घेत खेळायला पाहिजे होते. ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये बऱ्याच वेळा माझ्यावर १६ व्या किंवा १७ व्या षटकांत खेळण्याची संधी येते. अशा सामन्यांमध्ये १३० धावादेखील आव्हानात्मक धावसंख्या असते. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे,’’ असे धोनीने सांगितले.

’अंबाती रायुडूला फलंदाजीत बढती देण्याचे समर्थन करताना धोनी म्हणाला, ‘‘या युवा खेळाडूचे नैपुण्य पाहण्यासाठी ही चाल योग्य होती. मात्र त्याने संधीचा लाभ घेतला नाही. मी जर पाचव्या क्रमांकावर खेळावयास आलो तर सहाव्या क्रमांकाची जबाबदारी अनुभवी खेळाडूने घेतली पाहिजे.’’