महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी होणाऱ्या चर्चांवर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी मोठं विधान केलं आहे. संघातून धक्के मारुन बाहेर काढण्याआधी धोनीने निवृत्त व्हावं, भारतीय क्रिकेटसाठी धोनीने मोठं योगदान दिलं आहे मात्र आता नवीन पर्यायांचा विचार करण्याची वेळ आली असल्याचं, गावसकर India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“आता भारतीय संघ व्यवस्थापनाने धोनीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. नवोदीत खेळाडूंना आता अधिकाधिक संधी मिळायला हवी. आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार केला तर माझ्यादृष्टीकोनातून आता महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान नाहीये, टी-२० क्रिकेटमध्ये आता ऋषभ पंतलाच संधी मिळायला हवी.” गावसकरांनी आपलं मत मांडलं.

जर तुम्हाला ऋषभ पंतला पर्याय म्हणून विचार करायचा असेल तर मी संजू सॅमसनचं नाव सुचवेन. संजू चांगली फलंदाजी करतो आणि तो उत्तम यष्टीरक्षक आहे. टी-२० विश्वचषकासाठी तरुणांना संधी मिळायला हवी, धोनीचं भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान आहे मात्र आता त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. धक्के मारुन संघाबाहेर जाण्याआधी धोनीने निवृत्त व्हावं, गावसकरांनी आपलं परखड मत मांडलं.

अवश्य वाचा – पंतसाठी धोक्याची घंटा, निवड समिती पर्यायांच्या शोधात