शेवटच्या षटकात २३ धावांची खैरात : पुण्याचा पंजाबवर थरारक विजय
रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यामुळे तसा या लढतीला कोणताच अर्थ उरला नव्हता. अगदी शेवटच्या षटकात विजयासाठी २३ धावा शिल्लक असतानाही पुण्याला विजय मिळू शकेल, असे कुणालाही वाटले नव्हते. परंतु अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जिद्द असलेला निष्णात विजयवीर महेंद्रसिंग धोनीला हे नामंजूर होते. त्याने फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर आपल्या आक्रमणाची कमाल दाखवून ‘पंजाब तळ्यात, तर पुणे मळ्यात’ हे बोल सार्थ ठरवले. धोनीने ३२ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकारांनिशी नाबाद ६४ धावा काढून सामनावीर पुरस्कार पटकावला.
पुण्याने पंजाबचे १७२ धावांचे आव्हान पेलून चार विकेट्स राखून विजयाची नोंद केली. पंजाबच्या मोहित शर्माने १९व्या षटकात फक्त ६ धावा दिल्यामुळे पुण्यापुढील आव्हान अधिक कठीण झाले. या षटकांमध्ये धोनीने रवीचंद्रन अश्विनला फलंदाजी देण्याचे प्रकर्षांने टाळले. पंजाबचा कर्णधार मुरली विजयने शेवटचे षटक अक्षरकडे देण्याची चूक केली. अक्षरने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. मग दुसरा चेंडू अक्षरने वाइड टाकला. गोलंदाजाचा आत्मविश्वास कमकुवत झाल्याचे लक्षात येता धोनीने पुढील चेंडूवर लाँगऑनला सुरेख षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर धोनीने डीप कव्हरला ताकदीने मारलेला फटका हशिम अमलाने अगदी सीमारेषेपाशी अडवला. धोनीने धावून दोन धावा काढण्याचे या वेळी टाळले. मग चौथ्या चेंडूवर एक चौकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर डीप मिडविकेटला षटकार खेचून अखेरच्या चेंडूवर ६ धावा असे समीकरण केले. अनपेक्षित विजयाचा निर्धार करणाऱ्या धोनीने सहाव्या चेंडूवर आणखी एक षटकार मारून पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, पंजाबने मुरली विजय (५९) व गुरकिराट सिंग (५१) यांच्या अर्धशतकांच्या बळावर ७ बाद १७२ धावा केल्या. पुण्याच्या अश्विनने ३४ धावांत ४ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ७ बाद १७२ (मुरली विजय ५९, गुरकिराट सिंग ५१; रवीचंद्रन अश्विन ४/३४) पराभूत वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ६ बाद १७३ (महेंद्रसिंग धोनी नाबाद ६४, उस्मान ख्वाजा ३०; गुरकिराट सिंग २/१५

सामनावीर : महेंद्रसिंग धोनी</strong>