महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीने साऱ्यांनाच धक्का बसला असून यामध्ये ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडीनचाही समावेश आहे. धोनीची निवृत्ती धक्कादायक असली तरी तो क्रिकेटमधील खराखुरा सभ्य गृहस्थ आहे. संघाला सुस्थितीत आणूनच त्याने निवृत्तीचा मार्ग पत्करला, असे मत हॅडीनने व्यक्त केले आहे.
‘‘क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे खेळात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. पण परिस्थिती कशीही असो तो कधीही निराश झाला नाही. त्याने कधीही हार मानली नाही. धोनीचा खेळण्याचा दृष्टीकोन फार चांगली होती,’’ असे हॅडीन म्हणाला.
धोनीच्या निवृत्तीबाबत हॅडीन म्हणाला की, ‘‘धोनीची निवृत्ती धक्कादायक होती, भारतीय क्रिकेटची त्याने चांगली सेवा केली. त्याने ज्या पद्धतीने संघ आणि स्वत:ला हाताळले ते नक्कीच वाखाणण्याजोगे होते. भारतीय संघाचे कर्णधारपद ही फार मोठी गोष्ट असते, धोनीने शांतपणे ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली.’’