भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका

आज पाचव्या एकदिवसीय सामन्यात विजयाचा निर्धार; न्यूझीलंड संघातून गप्तीलची माघार

कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत स्विंग गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर धक्कादायक विजयाची नोंद केली. मात्र रविवारी होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात धोनी परतल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.

भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडू धोनी मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे दोन सामन्यांत खेळू शकला नाही. हॅमिल्टनच्या सामन्यात भारताचा डाव फक्त ९२ धावांत अनपेक्षितपणे गडगडला होता. त्यामुळे धोनी दुखापतीतून सावरणे संघासाठी दिलासा देणारे ठरेल. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-२ अशा विजयापेक्षा ४-१ असे वर्चस्व गाजवण्याचा भारताचा निर्धार आहे.

वेलिंग्टनच्या बॅसिन रिझव्‍‌र्ह मैदानावरील जोरदार वाऱ्यांची स्थिती पाहता वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पुन्हा आपली छाप पाडू शकेल. त्यामुळेच मधल्या फळीत धोनी हा घटक महत्त्वाचा ठरू शकेल. धोनी पाचव्या सामन्याला उपलब्ध असल्याचे साहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटले आहे.

शांत चित्ताने खेळी साकारण्याची धोनी वृत्ती संघासाठी बऱ्याचदा तारणारी ठरली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर धोनीचे हे वैशिष्टय़ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे युवा शुभमन गिलला संघाबाहेर जावे लागेल.

हॅमिल्टनच्या सामन्यामुळे भारताच्या फलंदाजीचे कच्चे दुवे समोर आले आहेत. विराट कोहली संघात नसताना रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सलामीवीर अपयशी ठरल्यावर अंबाती रायुडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक यांनी जबाबदारी खेळण्याची आवश्यकता होती. भारताच्या फलंदाजांनी अतिशय वाईट कामगिरी केल्याचे प्रभारी कर्णधार रोहितने मान्य केले.

टीव्ही कार्यक्रमात वादग्रस्त मत व्यक्त केल्यामुळे निलंबित झालेल्या हार्दिक पंडय़ाला पुनरागमनानंतर अद्याप आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी साकारता आलेली नाही. अखेरच्या सामन्यात मोहम्मद शमीला संघात स्थान मिळाल्यास भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली जाऊ शकते. चौथ्या सामन्यात खलील अहमदला प्रभाव पाडता आला नव्हता. या परिस्थितीत संघ व्यवस्थापन मोहम्मद सिराजला आजमावू शकेल.

न्यूझीलंडने चाथ्या सामन्यात कॉलिन मुन्रोच्या जागी सलामीला हेन्री निकोल्सला (नाबाद ३०) पाठवले होते. त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. रॉस टेलरचे धावांचे सातत्य टिकून आहे. सलामीवीर मार्टिन गप्तील पाचव्या सामन्याला मुकणार आहे. सराव सत्रात त्याच्या पाठीला दुखापत झाली होती.

चौथ्या सामन्यात भारताचा निम्मा संघ गारद करणाऱ्या बोल्टवर न्यूझीलंडची मदार आहे. तीन बळी घेणाऱ्या कॉलिन डी ग्रँडहोमचा आत्मविश्वाससुद्धा परतला आहे. याशिवाय अष्टपैलू जेम्स नीशाम आणि फिरकी गोलंदाज टॉड अ‍ॅस्टल यांच्यासारखे खेळाडू किवी संघात आहेत.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फग्र्युसन, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), कॉलिन मुन्रो, जिमी नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, रॉस टेलर.

* सामन्याची वेळ :सकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण :स्टार स्पोर्ट्स १