गेल्या ११ महिन्यांपासून महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे पुनरागमन करणे धोनीला कठीण जाणार असले तरी निवृत्तीबाबत सातत्याने चर्चा करून धोनीवर दडपण आणू नये. त्याने कधी निवृत्त व्हायचे, हे त्यालाच ठरवू द्या, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केली.

३८ वर्षीय धोनी मार्च महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगद्वारे (आयपीएल) स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात करणार होता. परंतु करोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्वच ठप्प पडल्याने धोनीचे पुनरागमन लांबले. त्यातच जर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यास धोनी त्यापूर्वी पुनरागमन करणार का, याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

‘‘धोनीसाठी पुनरागमन करणे फार कठीण असेल. मी त्याला ‘आयपीएल’साठी तयारी करताना पाहिले होते. त्या वेळी त्याची तंदुरुस्ती कमालीची होती. तो स्वत: पुनरागमन करण्यासाठी फार उत्सुक होता. परंतु आता प्रत्यक्षात क्रीडा सामन्यांना सुरुवात झाल्यावर त्याचा खरा कस असेल,’’ असे मोरे म्हणाले.

‘‘धोनी चाळिशीच्या जवळ पोहचला म्हणून त्याच्या निवृत्तीच्या मागे लागू नये. टेनिसमध्ये आजही ३५-४० वयोगटातील खेळाडूच सर्वोत्तम खेळ करत आहेत. क्रिकेटपासून बराच काळ दूर असल्याने कदाचित सुरुवातीला त्याला जम बसवणे कठीण जाईल. परंतु निवृत्तीचा निर्णय सर्वस्वीपणे धोनीचाच असून टीकाकारांनी त्याला सल्ले देणे बंद करावे,’’ असेही ५७ वर्षीय मोरे यांनी सांगितले.

धोनीवर संशय घेणे चुकीचे -होल्डिंग

गयाना : धोनीसारखा महान खेळाडू दशकात एखादाच घडतो. त्याच्यासारख्या खेळाडूच्या खिलाडूवृत्तीवर संशय घेणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी मांडले.

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने त्याच्या ‘ऑन फायर’ या आत्मचरित्रात विश्वचषकातील त्या सामन्याचा उल्लेख करून भारताला विजयी करण्यासाठी धोनीने प्रयत्नच केले नसल्याचे स्टोक्सने म्हटले आहे. परंतु होल्डिंग यांनी स्टोक्सचा दावा फेटाळून लावला आहे.

‘‘आजकाल प्रत्येकाला विचार मांडण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य असल्याने कोणीही काहीही लिहू शकतो. परंतु विश्वचषकातील भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना मी पूर्ण पाहिलेला आहे. धोनीच्या खेळण्यावर संशय घेणे चुकीचे आहे. त्या सामन्यात धोनीने परिस्थितीनुरूपच खेळ केला,’’ असे होल्डिंग म्हणाले.