इंग्लंडविरोधात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या झालेल्या पराभवामुळे फलंदाजांवर टीका होत आहे. विशेषत: महेंद्रसिंह धोनीच्या संथ फलंदाजीवर सगळ्यांनी टीका केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभ लिहिताना सुनील गावस्करांनी धोनीचा खेळ बघून मला माझी 36 धावांची खेळी आठवल्याचा उल्लेख केला आहे.

एकदिवसीय सामने 60 षटकांचे असताना सलामीला आलेल्या गावस्करांनी नाबाद 36 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी एकदिवसीय सामन्यात केल्याबद्दल गावस्करांवर टीकेची झोड उठली होती. धोनीनेही या सामन्यामध्ये 59 चेंडूंमध्ये अवघ्या 37 धावा केल्या. इंग्लंडच्या 322 धावांता पाठलाग करताना दमछाक झालेल्या भारताने 50 षटकांमध्ये अवघ्या 236 धावा केल्या आणि सणसणीत पराभव स्वीकारला. शेवटच्या 10 षटकांमध्ये भारताचा खेळ अत्यंत संथ झाला आणि धोनी त्याची नेहमीची कामगिरी करू शकला नाही. विकेट शाबूत ठेवत अत्यंत संथ गतीने फलंदाजी केल्यामुळे धोनीला प्रखर टीकेला तोंड द्यावे लागत आहे. धोनीच्या या खेळीचे वर्णन उपहासात्मक रीतीने करताना गावस्करांनाही स्वत:ची ती कुप्रसिद्ध 36 धावांची खेली आठवली.

विशेष म्हणजे याच सामन्यात धोनीनं 10 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम केला, परंतु भारताला सामना जिंकून देण्यास किंवा विजयाच्या समीप नेण्यास तो कमी पडला. भारताने हा सामना तब्बल 86 धावांनी गमावला. सामना भारत हरणार असं दिसताना चाहत्यांनी धोनीची व भारतीय संघाची हुर्ये केली. पाच षटकांमध्ये 110 धावांती भारताला गरज असताना त्यानंतर गेलेल्या प्रत्येक निर्धाव चेंडूवर प्रेक्षक भारतीय फलंदाजांची हुर्ये करत होते. त्यावेळी ड्रिंक्सच्या निमित्तानं खेळात वेग आणावा असा संदेश दिल्याचे सांगण्यात येते. त्यानंतरच्या पहिल्याच चेंडूवर धोनी बाद झाला. मात्र यजुवेंद्र चहल याच्या सांगण्यानुसार असा काही संदेश ड्रिंक्समननी दिला नव्हता.