पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळेल, अशी खेळपट्टी हवी, या भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने कडाडून टीका केली आहे. क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ बनण्याची इच्छा असल्यास कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असायला हवी, असे वॉ यांनी म्हटले आहे.
‘‘धोनीचे हे वक्तव्य क्रिकेटसाठी नकारात्मक असेच आहे. कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो. चेंडू वळतील, अशा खेळपट्टय़ा तयार करायला धोनीने भारतीय क्युरेटर्सना का सांगितले, त्यामागचे प्रयोजन मला कळले नाही. आक्रमक खेळ करण्याची आणि जगातील सर्वोत्तम संघ बनण्याची इच्छा असल्यास, कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची तयारी हवी. तुमच्या शैलीला अनुसरून खेळपट्टय़ा बनवण्याची मागणी करणे उचित नाही. त्यामुळे धोनीने असे वक्तव्य का केले, हेच मला कळले नाही,’’ असे स्टीव्ह वॉ यांनी सांगितले.
आपल्या कारकीर्दीविषयी स्टीव्ह वॉ म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सांभाळताना आम्हाला कोणत्या प्रकारच्या खेळपट्टीवर खेळावे लागणार आहे, याची कधीही तमा बाळगली नाही. ५७ सामन्यांत मी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सांभाळले, पण कधीही क्युरेटरविषयी एक शब्दही काढला नाही.’’ इंग्लंडविरुद्धची चार सामन्यांची मालिका भारतच जिंकेल, असेही स्टीव्ह वॉ यांना वाटते. याविषयी तो म्हणतो, ‘‘भारत हा बलाढय़ संघ आहे. भारताला त्यांच्याच भूमीत हरवणे कठीण असते. त्याचबरोबर संघात काही नव्या दमाचे खेळाडू आले आहेत, ही भारताच्या दृष्टीने चांगली बाब आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि प्रग्यान ओझासारखे खेळाडू चांगली कामगिरी करताहेत, हे भारतासाठी चांगले लक्षण आहे. भारतातील खेळपट्टय़ा त्यांच्या शैलीला पोषक असल्यामुळे यजमान संघ ही मालिका ३-० जिंकेल, असे मला वाटते.’’
पुढील वर्षी सुरुवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याविषयी स्टीव्ह वॉ म्हणाला, ‘‘ही मालिका रंगतदार होईल, हे निश्चित. जसे सचिन तेंडुलकर कधी निवृत्त होईल, हे सांगता येत नाही, तसे ऑस्ट्रेलिया ही मालिका जिंकू शकेल, हे सांगता येणार नाही. राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुलीसारखे खेळाडू नसतानाही भारताची कामगिरी चांगली होतेय, यावरून भारताची दुसरी फळी किती सक्षम आहे, याचा प्रत्यय येतो.’’