विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्ती पत्करेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. परंतु धोनीने अद्यापही निवृत्तीचा निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे जर लवकरच धोनी निवृत्त झाला नाही, तर त्याला संघातील स्थान गमवावे  लागू शकते, अशी खळबळजनक प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राला दिलेल्या खास मुलाखतीत त्या अधिकाऱ्याने धोनीच्या भवितव्याविषयी भाष्य केले. नुकताच वयाच्या ३९व्या वर्षांत पदार्पण केलेल्या धोनीने इंग्लंडविरुद्धच्या साखळी सामन्यात ३१ चेंडूंत ४२ धावा करूनही त्याच्यात सामना जिंकवून देण्याची ईर्षां दिसली नाही, असे काहींचे म्हणणे होते. त्याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही धोनीसारखा अनुभवी फलंदाज सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यामुळे त्याच्या संघभावनेवरसुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद लवकरच धोनीशी त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी चर्चा करणार आहेत.

‘‘धोनीने अजूनही निवृत्ती पत्करलेली नाही, हे खरंच धक्कादायक आहे. ऋषभ पंतसारखा युवा खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत आहे. विश्वचषकात धोनी त्याच्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना क्वचितच आढळला. सहाव्या आणि सातव्या स्थानावर फलंदाजीला येऊनही त्याला धावगती वाढवणे जमले नाही,’’ असे त्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

याव्यतिरिक्त आगामी विंडीज दौऱ्यासाठीसुद्धा धोनीच्या भारतीय संघात निवडीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यामुळे धोनी २०२०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीच्या संभाव्य संघातसुद्धा  असेल की नाही, याची खात्री नाही, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. धोनीला आम्हाला मानसिक त्रास द्यायचा नाही, परंतु त्याने भारतीय क्रिकेटसाठी भलेमोठे योगदान दिले असून त्याच्या निवृत्तीची वेळ जवळ आली आहे, असे अधिकारी म्हणाला. धोनीने विश्वचषकात नऊ सामन्यांत एकूण दोन अर्धशतकांसह २७३ धावा केल्या.

याव्यतिरिक्त विराट कोहलीचे कर्णधारपद, रवी शास्त्री यांची प्रशिक्षण कारकीर्द याविषयीसुद्धा प्रसाद चर्चा करणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.