नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनीयर यांनी निवड समिती आणि अनुष्का शर्माविषयी केलेल्या टीकेला भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार आणि प्रशासकीय समितीच्या माजी सदस्य डायना एडल्जी यांनी मूर्खपणाचे संबोधले आहे. एडल्जी यांनी त्यांच्या क्रिकेट ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.‘‘इंजिनीयर माझे जुने मित्र आहेत. परंतु त्यांचे क्रिकेट ज्ञान जाणून मलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा तरी विचार करायला हवा होता,’’ असे एडल्जी म्हणाल्या.

‘‘निवड समितीचा सदस्य एक सामना खेळलेला असो किंवा १०० सामने खेळलेला असो. तो अखेरीस त्या समितीचा सदस्य असतो. त्यामुळे इंजिनीयर यांनी यापुढे कोणाविषयीही वैयक्तिक टिपण्णी करणे टाळावे,’’ असेही ६३ वर्षीय एडल्जी यांनी सांगितले.