भारत विरूद्ध बांगलादेश… १० नोव्हेंबरचा सामना… मालिका १-१ अशी बरोबरीत असताना तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात भारताने दणकेबाज विजय मिळवला. त्या सामन्यात एका खेळाडूने दमदार कामगिरी करून दाखवली. बांगलादेशच्या गोलंदाजांची दाणादाण उडवत त्याने चक्क ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली. त्यात त्याने धडाकेबाज अशी हॅटट्रिकदेखील घेतली. टी-२०मध्ये भारताकडून हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज म्हणजे दीपक चहर.

दीपक चहरचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त ICCने त्याच्या या दमदार स्पेलच्या आठवणींना उजाळा दिला. दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर तो सामना भारताने जिंकला होता. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने भेदक मारा केला. त्याने त्याच्या ३.२ षटकांमध्ये केवळ ७ धावा दिल्या आणि तब्बल ६ बळी टिपले. त्यात त्याने एक हॅटट्रिकदेखील घेतली. १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आणि त्यानंतर २० व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर बळी घेत त्याने हॅटट्रिक पूर्ण केली होती.

पहा ती हॅटट्रिक-

असा रंगला होता सामना

भारताकडून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकं झळकावली होती. राहुलने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. तर युवा श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावा करत आपले पहिलेवहिले टी २० अर्धशतक झळकावले होते. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने अत्यंत खराब खेळी केली. पण मोहम्मद नईमने ८१ धावांची झुंज दिली होती. अखेर दीपक चहरच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा डाव १४४ धावांत आटोपला होता.