आंतरराष्ट्रीय फुटबॉलविश्वात आपल्या बहारदार खेळीच्या जोरावर स्वतःचं नाव निर्माण करणारे अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६० व्या वर्षी हृदृयविकाराच्या झटक्यामुळे मॅरेडोना यांची प्राणज्योत मालवली. १९८६ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत मॅरेडोना यांनी अंतिम फेरीत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मेक्सिको येथे झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडवर २-१ ने मात करत विजेतेपद पटकावलं. या सामन्यात मॅरेडोना यांनी झळकावलेल्या एक गोल फुटबॉलविश्वात Hands of God नावाने ओळखला जाऊ लागला.

आणखी वाचा- ‘एक दिवस आम्ही दोघं वर एकत्र फुटबॉल खेळू’, मॅरेडोना यांच्या निधनानंतर पेले यांची भावनिक प्रतिक्रिया

२२ जून १९८६ साली मेक्सिकोच्या अझटेका स्टेडीयमवर झालेल्या अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना मध्यांतरापर्यंत ०-० असा बरोबरीत सुरु होता. मध्यांतरानंतर मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाकडून पहिला गोल झळकावला. परंतू हा गोल करत असताना मॅरेडोना यांचा हात बॉलला लागला होता. फुटबॉलच्या नियमानुसार मैदानातील पंचांनी यावेळी मॅरेडोना यांना येलो कार्ड दाखवून गोल नाकारणं गरजेचं होतं. मात्र मॅरेडोना यांचा हात बॉलला लागला हे पंचांच्या दृष्टीपथात नव्हतं आणि त्यादरम्यान व्हिडीओ रेफरल सिस्टीम उपलब्ध नसल्यामुळे मॅरेडोना यांचा हा गोल वैध ठरवण्यात आला. या गोलच्या आधारे अर्जेंटिनाने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.

आणखी वाचा- मॅरेडोना यांचा वारसा पुढे चालवणारा मेसी म्हणतो…

सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाने २-१ ने बाजी मारत विजेतेपदावर मोहर उमटवली होती. मॅरेडोना यांनी झळकावलेला दुसरा गोल हा फुटबॉलविश्वात ‘गोल ऑफ द सेंच्यूरी’ म्हणून ओळखला जातो. अंतिम सामना संपल्यानंतर पत्रकारांनी मॅरेडोना यांना पहिल्या गोलविषयी विचारलं असता मॅरेडोना यांनी त्या गोलचं वर्णन Hands of God असं केलं होतं. या सामन्यात रेफ्री म्हणून काम पाहणारे ट्युनिशीयाचे अली बेनासूर यांनी मॅरेडोना यांचा पहिला गोल वैध ठरवल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी याविरोधात नाराजी व्यक्त करत लाईन्समनच मत घ्यायला सांगितलं. परंतू दुर्दैवाने लाईन्समननेही मॅरेडोना यांच्या पारड्यात मत टाकलं. मेक्सिकन फोटोग्राफर अलेजांड्रो ओजेडा यांच्या कॅमेऱ्यात मात्र मॅरेडोना यांची ही कृती कैद झाली होती.