राजकारण आणि क्रीडा ही दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत. या भिन्न क्षेत्रातील दोन दिग्ग्जांमध्ये दृढ नातं असल्याची उदहारण फार अपवादात्मक आहेत. फुटबॉल विश्वातील महान खेळाडू दिएगो मॅरेडोना आणि क्युबाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्यामधील नातं सुद्धा असंच होतं. लॅटिन अमेरिकन देशातील या दोन दिग्गजांमधील केमिस्ट्रीची त्यावेळी मीडियामध्ये बरीच चर्चा व्हायची.

कॅस्ट्रो मॅरेडोनासाठी वडिलांसमान होते. मॅरेडोना यांनी कॅस्ट्रोंना वडिलकीचा दर्जा दिला होता. या दोघांमध्ये मैत्रीपलीकडचं नातं होतं. दिएगो मॅरेडोना यशस्वी फुटबॉलपटू असले तरी त्यांची स्वत:ची अशी राजकीय मतं होती. आपली राजकीय भूमिका मांडण्यापासून मॅरेडोना स्वत: कधीही कचरले नाहीत. त्यांना राजकीय दृष्टया जे योग्य वाटलं, ते त्यांनी जाहीरपणे मांडलं. लॅटिन अमेरिकेतील डाव्या विचारसरणीच्या राजकारण्यांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला.

आणखी वाचा- ‘त्या’ प्रसिद्ध सामन्यात इंग्लंडवरील विजयामागे मॅरेडोना यांच्या मनात होती बदल्याची भावना, पण का?

मॅरेडोना फिडेल कॅस्ट्रो यांचे मोठे चाहते होते. ते क्युबने नेत्यांना आपला आदर्श मानायचे. मॅरेडोना यांच्या डाव्या पायावर फिडेल यांचा टॅटू होता तर उजव्या हातावर चे गवेरा यांचा टॅटू गोंदवून घेतला होता. अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकपमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर एकावर्षाने १९८७ साली मॅरेडोना पहिल्यांदा फिडेल कॅस्ट्रो यांना भेटले. पण त्यांच्यामधलं नातं खऱ्या अर्थाने बहरले ते २००० साली. त्यावेळी मॅरेडोना आपली ड्रग्जची सवय सोडवण्यासाठी क्युबामध्ये होते.

आणखी वाचा- मॅरेडोना यांचा वारसा पुढे चालवणारा मेसी म्हणतो…

क्युबामधील त्या चार वर्षांच्या वास्तव्यात कॅस्ट्रो यांनी कशी मदत केली त्याबद्दल मॅरेडोना नेहमी सांगायचे. “मॅरेडोनाचा मृत्यू आपल्या डोक्यावर नको म्हणून अर्जेंटिनामधल्या क्लिनिक्सचे दरवाजे बंद झाले होते, तेव्हा त्यांनी क्युबाचे दरवाजे माझ्यासाठी उघडले” असे मॅरेडोना म्हणाले होते. “कॅस्ट्रो यांच्याबरोबर मी मॉर्निंग वॉकला जायचो, त्यावेळी आमच्यामध्ये क्रीडा, राजकारण या विषयांवरही चर्चा व्हायची” असे मॅरेडोना यांनी सांगितले होते.

आणखी वाचा- ‘एक दिवस आम्ही दोघं वर एकत्र फुटबॉल खेळू’, मॅरेडोना यांच्या निधनानंतर पेले यांची भावनिक प्रतिक्रिया

कॅस्ट्रो आणि मॅरेडोना यांच्यात जगाच्या दृष्टीने मैत्रीचं नातं असलं तरी मॅरेडोनाने कॅस्ट्रोना वडिलांचा दर्जा दिला होता. काल या दिग्गज फुटबॉलपटूने जगाचा निरोप घेतला, त्यावेळी एक अजब योगायोग घडून आला. चार वर्षांपूर्वी याच दिवशी २५ नोव्हेंबर २०१६ रोजी कॅस्ट्रो यांचे निधन झाले होते.