अर्जेटिनाचे दिग्गज खेळाडू दिएगो मॅराडोना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी उभे राहणार असल्याची माहिती उरुग्वेतील पत्रकाराने दिली आहे. ‘‘फिफा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत मॅराडोना यांना विचारले असता त्यांनी मी दावेदार आहे असे सांगितले, अशी माहिती पत्रकार विक्टर ह्य़ुगो मोरालेस यांनी ट्विटरद्वारे दिली. फिफावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सेप ब्लाटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करणाऱ्यांमध्ये मॅराडोना यांचाही समावेश होता. ब्राझीलचे माजी खेळाडू झिको आणि लिबेरियन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष मुसा बिलिटी यांनी याआधीच अध्यक्षपदासाठी दावेदारी केली आहे.