अतिक्रिकेटबद्दल सचिन तेंडुलकरचे मत

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना खेळाडूंना अतिक्रिकेटचा त्रास जाणवतो. मात्र आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूच्या गरजा वेगवेगळ्या असतात. विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करताना प्रत्येक खेळाडू आयपीएलसारख्या व्यासपीठाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले.

विश्वचषक स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये अतिक्रिकेटच्या त्रासाला सामोरे जावे लागेल का, याविषयी सचिनने आपली मते मांडली. याविषयी सचिनने कर्णधार विराट कोहलीच्या मताशी सहमती दर्शवली. ‘‘खेळाडूंनी लयीत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे लयीत येण्यासाठी कोणत्या सामन्यात खेळावे किंवा किती विश्रांती घ्यावी, हे समजण्याइतपत भारतीय क्रिकेटपटू सक्षम आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक निर्णय घ्यावा लागणार आहे,’’ असेही सचिनने सांगितले.

‘‘आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरावरील कामाचा ताण वेगळा असेल. त्या तुलनेत विराट कोहलीसारखा फलंदाज आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या यष्टीरक्षक-फलंदाजावरील ताण कमी असेल. भारतातील सर्वच खेळाडू अनुभवी असून त्यांनी अतिक्रिकेटविषयी स्वत:हून योग्य निर्णय घ्यावा. जर मी १० किंवा १५ सामने खेळणार असेल, याचा अर्थ प्रत्येक खेळाडू तितकेच सामने खेळेल, असा होत नाही. माझे शरीर मला कितपत साथ देत आहे, हे ठरवूनच निर्णय घ्यावा,’’ असा सल्लाही सचिनने दिला.

कुलदीप म्हणजे कलागुणांची खाण -चावला

भारतीय संघाचा अव्वल फिरकीपटू कुलदीप यादवच्या यशात जादुई गोलंदाजीचे काहीही योगदान नसून त्याच्या अंगी असलेल्या कौशल्य गुणांमुळेच तो अप्रतिम गोलंदाज बनला आहे, अशा शब्दांत भारताचा वरिष्ठ फिरकीपटू पियुष चावलाने सोमवारी कुलदीपची पाठ थोपटली.

चावला व कुलदीप हे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतात. ‘‘कुलदीप ने कधीच स्वत:ला जादुई फिरकी गोलंदाज म्हणून संबोधले नाही. विशेष म्हणजे ‘जादुई गोलंदाज’ हे चाहत्यांनीच त्याला दिलेले नाव असून ते चुकीचे आहे.

कुलदीपकडे चेंडूला फिरवण्याची कला असून त्याला हवेत उंची देण्यासाठी तो कधीच घाबरत नाही. त्याच्या अंगी असंख्य कलागुण असल्यानेच तो आजच्या घडीला एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून उदयास आला आहे,’’ असे बराच काळ भारतीय संघातून स्थान गमावलेल्या चावलाने सांगितले