03 March 2021

News Flash

केनियामध्ये खेळात कारकीर्द घडवणे कठीण

सध्याच्या केनियाचा कबड्डी संघ चांगली कामगिरी करतो आहे, पण त्यांना त्यांचे भवितव्य माहिती नाही.

कबड्डी प्रशिक्षक आणि संघटक लवेंडा ओगुटा यांची खंत

केनियामध्ये लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. मग भले कुणी अभियंता असो किंवा उच्च विद्याविभूषित. खेळाडूंच्या व्यथा त्यापेक्षा वेगळ्या काय असणार. त्यामुळे केनियामध्ये खेळात कारकीर्द घडवणे कठीण असल्याची खंत विश्वचषक कबड्डी संघाच्या प्रशिक्षक व राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्ष लवेंडा ओटुगा यांनी व्यक्त केली.

‘‘आम्हाला सरकारने कबड्डीसाठी एकही पैसा दिला नाही. स्वत:च्या खिशातले पैसे टाकून कबड्डी खेळतो. खेळाडूंना मोठी बक्षिसे नाहीत, नोकऱ्या नाहीत. त्यांनी आपल्या खेळाच्या बळावर जे मिळवायचे ते मिळवावे, अशी सरकारची भूमिका आहे,’’ अशी कैफियत ओटुगा यांनी मांडली.

‘‘सध्याच्या केनियाचा कबड्डी संघ चांगली कामगिरी करतो आहे, पण त्यांना त्यांचे भवितव्य माहिती नाही. ते अधांतरीच आहे. हे खेळाडू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात. त्याचबरोबर प्लम्बर, वायरमन अशी रोजंदारीवर काम करतात. त्यानंतर ते कबड्डीला वेळ देतात. त्यामुळे त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा करणे गैर आहे.  आर्थिक सुरक्षितता असेल तर ते कबड्डीवर लक्ष केंद्रित करून उत्तम कामगिरी करू शकतील,’’ असे लवेंडा सांगत होत्या.

विश्वचषकाच्या निमित्ताने भारतामध्ये आलेल्या खेळाडूंच्या कुटुंबीयांच्या भावना मांडताना लवेंडा म्हणाल्या की, ‘‘कबड्डीकडून त्यांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. जर विश्वचषकात चांगली कामगिरी झाली तर सरकार त्यांच्याकडे लक्ष देईल. त्याचबरोबर त्यांना प्रो कबड्डी लीगमध्येही खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे त्यांना भविष्यात आर्थिक चणचण भासणार नाही, अशी आशा आहे.’’

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘या खेळाडूंना सारे काही नवीन आहे. ते कबड्डीच्या निमित्ताने पहिल्यांदा विमानात बसले, पहिल्यांदा मोठय़ा हॉटेलमध्ये आले. त्यामुळे ते खूश आहेत. कबड्डी आपल्याला हे सारे देऊ शकते, असा विचार करून ते भारावून गेले आहेत. पण आम्हाला अजून बरीच मजल मारायची आहे. हा विश्वचषक त्यांना कबड्डीच्या आणखी जवळ घेऊन जाईल.’’

केनियामध्ये कबड्डीची सुरुवात कशी झाली आणि सध्या कशी परिस्थिती आहे, याबद्दल लवेंडा म्हणाल्या की, ‘‘२०१३मध्ये पंजाबमध्ये वर्तुळाकार कबड्डी स्पर्धा झाली होती. त्या वेळी मी तिथे आले होते. त्या वेळी प्रशिक्षक अशोक दास यांनी मला हा खेळ दाखवला. मला तो आवडला. हा खेळ आपल्या देशातही खेळला जावा, असे मी ठरवले आणि केनियामध्ये कबड्डीचा प्रसार करायला सुरुवात केली. सध्याच्या घडीला शाळकरी विद्यार्थीही कबड्डी खेळतात. कबड्डी केनियामध्ये बाळसे धरत आहे, असे तुम्ही म्हणू शकता. पण हा खेळ आम्हाला नवीन राहिलेला नाही. कबड्डीच्या बऱ्याचशा चित्रफिती आम्ही पाहिल्या, प्रो-कबड्डी लीग पाहिली आणि त्यामधून आम्ही शिकत आहोत.’’

सरावासाठी अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक

सरकार आम्हाला आर्थिक मदत करत नाही. पण सरावासाठी आम्ही त्यांच्याकडे जागा मागितली होती. केनियामध्ये अ‍ॅथलेटिक्स हा खेळ प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी स्टेडियम्सही बांधली आहेत. त्यामुळे सरकारने आम्हाला अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर सराव करण्याची परवानगी दिली. पण अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक आणि कबड्डीची मॅट यामध्ये फारच फरक आहे. पण आमच्यासाठी हेही नसे थोडके.

पुरुषांचा अहंकार दुखावतो

मी पुरुषांच्या कबड्डी संघाची प्रशिक्षिका असल्यामुळे बऱ्याच जणांचा अहंकार दुखावतो. त्यामुळे खेळाडूंना सामन्यामध्ये मी कोणतेही मार्गदर्शन करत नाही. काही सांगायला गेले व त्यांचा अहंकार दुखावला तर त्याचा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

महिलांसाठी काहीही अशक्य नाही

प्रशिक्षक व संघटनेची अध्यक्ष या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. काही जणांना वाटत होते की, मला या दोन्ही जबाबदाऱ्या पेलवता येणार नाहीत. पण महिलांना काहीही अशक्य नाही. आम्ही महिला चांगले व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे माझा दिवस सकाळी ४ वाजता सुरू होतो, त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत मी काम करत असते.

भारतातले खेळाडू नशीबवान

भारतामधील खेळाडू नशीबवान आहेत, असे मला वाटते. कारण त्यांनी यश मिळवल्यावर त्यांचा सत्कार होतो, त्यांना बक्षिसे दिली जातात, त्यांना नोकऱ्या मिळतात. त्याचबरोबर भारतामध्ये खेळसाठी पायाभूत सुविधा आहेत. पण केनियामध्ये असे चित्र नाही. त्यामुळे मी सामन्यादरम्यान खेळाडूंशी जास्त चर्चा करत नाही.

‘बडी’मुळे केनियामध्ये कबड्डी प्रसिद्ध

आमच्याकडे ‘बडी’ म्हणजे दोस्त. त्यामुळे कबड्डीतील ‘बडी’ या शब्दामुळे हा खेळ आमच्याकडे प्रसिद्ध होण्यास मदत झाली. या ‘बडी’ शब्दामुळे अधिक लोक या खेळाकडे आकर्षित झाली.

आमची कामगिरीच बोलून दाखवेल!

सरकारकडून आम्हाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. पण त्यांनी आमची दखल घ्यावी, यासाठी आम्ही कामगिरीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आमची कामगिरीच त्यांना बोलून दाखवेल. या स्पर्धेत पदक जिंकण्याचे आमचे ध्येय आहे. जर आम्ही पदक जिंकले तर सरकार आमची दखल घेईल. कारण केनियामध्ये फक्त पदकविजेत्यांचीच दखल घेतली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 3:57 am

Web Title: difficult constitute in the sport career in kenya says kabaddi coach lavender oguta
Next Stories
1 बांगलादेशलाही कोरियाचा धक्का
2 एकदिवसीय क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी भारताला या फरकाने जिंकावी लागेल मालिका
3 पॅरा-सायकलिस्ट आदित्य मेहताला बंगळुरू विमानतळावर काढायला लावला कृत्रिम पाय!
Just Now!
X